पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको
By admin | Published: May 19, 2014 12:18 AM2014-05-19T00:18:47+5:302014-05-19T00:18:47+5:30
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली.
पुणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली. त्याचे पडसाद तत्काळ उमटले. कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार व पदाधिकार्यांनी व्यक्त केली. पुण्यातील विकास आराखडा, मेट्रो, पार्किंग नियमावली असे अनेक विषय मुख्यमंत्री चव्हाण यांनी मार्गी लावले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्व जनतेला त्यांची ओळख आहे. स्वपक्षीय पदाधिकार्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. पराभव हा कोणा एकट्यामुळे होत नसतो, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले. देशभरातील मोदी लाटेमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचे एकट्या मुख्यमंत्र्यांवर खापर फोडणे योग्य होणार नाही. राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक सभा घेतल्या, तसेच त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. त्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, राजीनामा मागण्याच्या भूमिकेला कॉँग्रेसच्या इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)