उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:48 PM2020-01-15T20:48:45+5:302020-01-15T20:51:08+5:30
गेले दोन दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नावातील शिव काढून टाका, शिवसेनाभवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली का ठेवला असा प्रश्न विचारला होता.
मुंबई : दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात एका नेत्याने प्रकाशित केलेल्या 'आज के शिवाजी' पुस्तकावरून उठलेला वाद आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या पुराव्या पर्यंत पोहोचला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंना पुरावेच घेऊन या असे आव्हान दिले होते. यावर शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्यूत्तर दिले आहे.
गेले दोन दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नावातील शिव काढून टाका, शिवसेनाभवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली का ठेवला असा प्रश्न विचारला होता. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज त्यांना वंशज असल्याचे पुरावेच घेऊन येण्याचे आव्हान दिले होते. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नसून आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनीदेखील यामध्ये उडी घेतली आहे.
शिवरायांच्या घराण्यात आम्ही जन्माला आलोय, हे जनतेला माहिती आहे. वेगळे पुरावे द्यायची गरज नसल्याचे सुनावतानाच त्यांनी हा वाद संजय राऊत यांनी सुरू केला आहे, त्यांनीच संपवावा असे आवाहन केले होते. यावर संजय राऊत यांचे नुकतेच ट्विट आले आहे.
'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'
शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
जाणता राजा या उपाधीबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....
यामध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. तसेच छत्रपतींच्याया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे', असे म्हणत त्यांनी भाजपाला या वादात ओढले आहे. या पराभवाबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची आणि महाराष्ट्राची माफी मागेला का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे..छत्रपतीचया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2020
पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला..हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे..त्या बद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?