पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात
By admin | Published: February 27, 2017 12:13 AM2017-02-27T00:13:40+5:302017-02-27T00:13:40+5:30
निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात किमान २०० याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांतील पराभूत उमेदवार व प्रतिनिधींच्या बैठकीत शनिवारी ठरविण्यात आले. यावेळी मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणीही करण्यात आली.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने ९८ जागांवर विजय संपादन करीत घवघवीत यश मिळविले आहे. अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, ही मते मतदान यंत्रांतील घोळामुळे मिळाल्याचा आरोप अनेक पराभुत उमेदवारांकडून केला जात आहे. या मुद्यावर शनिवारी विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकत्र आले. यावेळी माजी आमदार बापु पठारे, नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, अॅड. रुपाली पाटील, सचिन भगत, धनंजय जाधव, विनायक हनमघर यांच्यासह दत्ता गायकवाड, विजय मारटकर, निलेश निकम, राम बोरकर, नारायण चव्हाण, सुधीर काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार तसेच मोठ्या संख्यने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाची पालिकेत एकहाती सत्ता आली आहे. पण त्यासाठी सत्तेचा गैरवापर करून मतदान यंत्रात मोठा घोळ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)