भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू
By admin | Published: August 11, 2016 04:40 AM2016-08-11T04:40:10+5:302016-08-11T04:40:10+5:30
एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सरकारच्या भ्रष्ट कारभाराची सुरुवात आहे. अधिवेशनादरम्यान अनेक मंत्र्यांचे अनेक प्रकार उजेडात आले
सांगली : एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सरकारच्या भ्रष्ट कारभाराची सुरुवात आहे. अधिवेशनादरम्यान अनेक मंत्र्यांचे अनेक प्रकार उजेडात आले. भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करून भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, विद्यमान सरकारचा कारभार चांगला चाललेला नाही. एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणे उजेडात येत असल्याने जनतेलाही काय कळायचे ते कळले आहे. आम्ही विरोधक म्हणून अशा भ्रष्ट मंत्र्यांना सरकार जोपर्यंत घरी बसवित नाही, तोपर्यंत प्रकरणांचा पाठपुरावा करीत राहणार आहोत. अनेक चौकशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावत आहेत, मात्र त्या पूर्ण कधी होणार, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. सरकारकडे चांगली लोकं नसल्याने गोंधळ निर्माण होऊन कारभार दिशाहीन बनला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना गेल्या महिन्याभरात घडल्या. कोपर्डी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, उस्मानाबाद, मिरज याठिकाणच्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. गुन्हेगारांवर दहशत बसावी, अशा कोणत्याही गोष्टी सरकार करीत नाही. त्यामुळे अपप्रवृत्ती वाढत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या योग्यरितीने होत नसल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मानधन वाढीचा निर्णय योग्यच!
फ्रान्स, सिंगापूर, तसेच अन्य देशात अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींचे मानधन अधिक आहे. आपल्या देशात आमदार, खासदारांचे मानधन वाढविण्याचा निर्णय तेच घेत असतात. त्यामुळे लोकांना या गोष्टीची चीड येते. वास्तविक त्यांच्या खर्चाचा विचार केला, तर मानधन वाढीच्या निर्णयात अयोग्य काहीच नाही.