नोकरीच्या नावाखाली फसवणारे रॅकेट उद्ध्वस्त
By Admin | Published: October 31, 2016 05:42 AM2016-10-31T05:42:02+5:302016-10-31T05:42:02+5:30
अमेरिका, रशियात नोकरी लावण्याच्या अमीषा दाखवून उच्च शिक्षित तरुणांना गंडा घालणारे एक रॅकेट आंबोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.
मुंबई : अमेरिका, रशियात नोकरी लावण्याच्या अमीषा दाखवून उच्च शिक्षित तरुणांना गंडा घालणारे एक रॅकेट आंबोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत एका तरुणीसह पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी १५ साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दिव्येश पटेल (वय ४१), शाहीन शेख (२७), रमेश भंडारी उर्फ राम अगरवाल (३०), सोहन शर्मा ( २६) व सल्लाउद्दीन साळे (३१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सगळ््यांनी मुंबई व अहमदाबादेतील सुमारे २५० हून अधिक युवकांची फसवणूक केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. फसवणुकीची रक्कम दहा कोटींहून अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अंधेरीत एक्सल इंटरनॅशनल नावाने बनावट कंपनीची स्थापना या आरोपींनी केली होती. त्याद्वारे ते वृत्तपत्रांमध्ये अमेरिका, इंग्लंड, रशिया आदी देशांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, एमबीए झालेल्या तरुणांना भल्या मोठ्या पगाराच्या नोकरी उपलब्ध करुन देण्याची जाहिरात देत असतं. त्यानंतर संपर्कात आलेल्या तरुणांकडून अर्ज मागवून तीन, चार टप्प्यांमध्ये रक्कम वसूल करुन घेत. विश्वास बसण्यासाठी ते परदेशातील विविध कंपन्यांच्या नावे बनावट लेटरहेडवर नेमणुकीचे पत्र देखील देत असत. त्यानंतर व्हिसा मिळण्यासाठी विलंब लागत असल्याचे २-३ महिने प्रतिक्षा करण्यास सांगत असत. जूनमध्ये एमबीए झालेल्या एका तरुणाने जाहिरात पाहून कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी त्याच्याकडून अर्ज घेण्यासाठी ५० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याला ब्रिटीश कंपनीचे नियुक्तीपत्र देवून साडेतीन लाख रुपये व पासपोर्ट आणि व्हिसा बनविण्यासाठी तीन लाखांची मागणी या आरोपींनी केली. ही पूर्तता केल्यानंतर दोन महिने त्याला ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे वैतागून तो कंपनीच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेला असता त्याला आॅफिस बंद आढळून आले. त्यावेळी त्याच्याप्रमाणे फसवणूक झालेले अन्य काही तरुणही तेथे होते. त्यापैकी २४ जणांनी अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेवून फसवणुकीची तक्रार दिली.
पोलिसांना तपासात अहमदाबाद येथील एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरुन माहिती घेतली असता त्याठिकाणीही याच नावाने एक आॅफिस थाटल्याचे लक्षात आले. संबंधितांचा शोध घेऊ लागल्यानंतर सर्वांचे मोबाईल फोन बंद असल्याचे पोलिसांना समजले. तथापि, शिताफीने तपास करुन या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पटेलने ‘यूएस’मध्ये एका तरुणीशी विवाह करुन वास्तव्यासाठी ‘ग्रीन कार्ड’ मिळविले होते. मात्र तिने फसवणूक झाल्याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर २०१४ मध्ये पटेलला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
>पटेल हाच मुख्य सूत्रधार
पटेल हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून त्याच्याकडे ‘यूएस’मधील वास्तव्याचे ग्रीन कार्ड होते. मात्र त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याने दोन वर्षांपूर्वी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याने फसवणूक केलेल्यांमध्ये डॉक्टर, एमबीएसह अनेक उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे.
शाहीन शेख व दिव्येश पटेल हे मूळचे अहमदाबाद येथील असून अटक केलेले उर्वरित तिघे मुंबईतील आहेत. ते तरुणांकडून पैसे उकळून दोघांच्या खात्यावर पैसे जमा करत असत.