निराधारांचा ‘स्वराधार’
By Admin | Published: March 8, 2016 08:16 PM2016-03-08T20:16:40+5:302016-03-08T20:17:13+5:30
ट्रेनच्या डब्ब्यात गाणा-यांमधील गान सरस्वती पारखून त्यांना कलाकाराचा दर्जा देण्याचे कार्य अंधेरीतील 24 वर्षीय हेमलता महेंद्र तिवारी हिने ‘स्वराधार’व्दारे केले आहे.
लीनल गावडे
मुंबई, दि. ८ - ‘शिर्डीवाले साईबाबा’..., ‘ए मालिक तेरे बंद हम’.. अशी गाणी ट्रेनच्या डब्यामध्ये गाऊन पोटाची खळगी भरणारे अंध आणि भिका-यांचा प्रवासी अनेकदा त्रास होतो या कारणाने हाकलून देतात. पण त्यांच्यात वास करणारी गान सरस्वती पारखून त्यांना कलाकाराचा दर्जा देण्याचे कार्य अंधेरीतील 24 वर्षीय हेमलता महेंद्र तिवारी हिने ‘स्वराधार’व्दारे केले आहे.
मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना गाऊन उदरनिर्वाह करणारी माणसे दिसतात. पण त्यांचे गाणो ऐकण्याचा वेळ कित्येकांना नसतो. पण या गर्दीतही अशांचा आवाज हेमलताच्या मनात घर करुन राहिला. 1 मे २०१० साली ‘महाराष्ट्र’ दिनाच्या कार्यक्रमासाठी चर्चगेट येथे जात असताना अंधेरी स्थानकातील दोन वृद्ध तबला आणि हार्मोनियम वाजवताना हेमलताने पाहिले. त्यांच्या भोवती प्रवाशांचा घोळका होता. त्या घोळक्यातून वाट काढत हेमलताने त्यांचे सादरीकरण पाहिले.
त्यांच्या वाद्यांच्या सादरीकरणाने खुश होऊन अनेकांनी त्यांच्या समोर पैसे भिरकावले आणि निघून गेले. हेमलताही महाराष्ट्र दिनाच्या संगीत कार्यक्रमासाठी निघून गेली. या कार्यक्रमातील गायक, वादकांकडे पाहून तिला अंधेरी स्टेशनच्या वादकांची आठवण झाली त्याच क्षणी हेमलताने रेल्वे डब्यात आणि रेल्वे आवारात गाणी गाऊन, वाद्य वाजवून पोटाची खळगी भरणा-यांना समाजात ‘कलाकाराचा’ दर्जा आणि ‘व्यासपीठ’ मिळवून द्यायचे ठरवले.
‘स्वराधार’ ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी हेमलताला 2 वर्षे लागली. या काळात मयूर शहा, ओंकार पाटील, अनुजा प्रभू- आजगावकर, दिलीप तुपे यांच्या मदतीने तिने ‘मध्य’, ‘पश्चिम’, ‘हार्बर’ मार्गावरील गाणा-यांचा शोध सुरु केला. या शोधादरम्यान अनेक अंध गायक, वादक ८ ते १० जणच सापडले.
या सा-यांना शोधून संघटित करण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागले. याविषयी हेमलता म्हणते,‘ या कलाकारांना संघटित करणो सोपे नव्हते. आधी आधी तर त्यांना आम्ही मस्करी करत आहोत असे वाटायचे. पण कालांतराने त्यांना आमच्या या प्रयत्नाचा हेवा वाटत गेला आणि त्यांनी आमच्या सोबत काम सुरू केले. एक वर्ष माणसांची जमवाजमव केल्यानंतर त्यांना व्यासपीठापर्यंत नेण्यासाठी संगीताचे रितसर ज्ञान देणोही आवश्यक होते. यासाठी ‘स्वराधार’ सोबत काम करणा-या दत्ता मेस्त्री यांनी कलाकारांना संगीताचे धडे दिले आणि त्यांना गायनासाठी तयार केले.
दोन वर्षाच्या या अथक प्रयत्नांती ‘स्वराधार’ आकार घेऊ लागला आणि सप्टेंबर २०१२ मध्ये पहिला संगीताचा कार्यक्रम या कलाकारांनी केला. या कार्यक्रमातील कलाकाराच्या सादरीकरणाने कित्येकजण थक्क झाली आणि या दिवसागणिक कार्यक्रमांना वेग आला. अनेक मंडळांनी कुतूहल म्हणून या कलाकार मंडळींना बोलावून गाण्यांचे कार्यक्रम करुन घेतले.
तर अनेकांनी ट्रेनमध्ये गाणारे कार्यक्रम कसा करणार असा सवाल उपस्थिही केला. पण त्या सा:यावर मात करत स्वराधारच्या कलाकारांनी स्वत: ला सिद्ध केले. असे हेमलता अभिमानाने सांगते.
स्वराधार संस्थेला ४ वर्षे पूर्ण झाली असून आता कलाकारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. महिन्यातून २ संगीताचे कार्यक्रम स्वराधार हमखास करते. याशिवाय सणांच्या दिवसात तर या कलाकारांना अनेक ठिकाणी आवजरून बोलवले जाते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हेमलताचे कार्य पोहोचले असून अनेक वाहिन्यांनीही हेमलता कार्याची दखल घेतली आहे. रेल्वे डब्ब्यात गाणा-यांना व्यासपीठ मिळवून देण्याची इच्छा बाळगलेल्या हेमलताची मेहनत सत्यात उतरली आहे. पण अजूनही तिला या कार्याचा आवाका वाढवायचा आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळी गाठायची आहे. त्यासाठी ‘स्वराधार’ चे प्रयत्न सुरु आहेत.
‘स्ट्रिट परफोर्मिग कल्चर’ जपायचेय
‘स्वराधार’च्या माध्यमातून रेल्वेतून संगीताचे सादरीकरण करणा-यांना आम्ही संघटित करत आहोत. ‘स्ट्रिट परफोर्मिग कल्चर’ आम्हाला जपायचे आहे. सध्या कित्येकांना आपण रस्त्यांवर कला सादर करताना पाहतो. पण अशांना व्यासपीठ मिळत नाही. त्यांना पुढील काळात व्यासपीठ मिळवून द्यायचे आहे. तुम्हालाही असे कलाकार आढळले तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर या विषयी माहिती देऊ शकता आणि ‘स्वराधार’ला मदत करु शकता.
- हेमलता महेंद्र तिवारी, संस्थापक ‘स्वराधार’
आयुष्य पूर्णत: बदलले
रेल्वेत गाणी गायचो,तेव्हा भिकारी म्हणून डब्यातून बाहेर काढले जायचे. पण ‘स्वराधार’ च्या माध्यमातून हेमलता ताईने आम्हाला व्यासपीठ मिळवून दिले. आमच्यातील कलेला योग्य न्याय मिळाला असे वाटते. लोकांनी आम्हाला अनेक वाहिन्यांवर गाण्याचे कार्यक्रम करताना पाहिले असल्यामुळे सेल्फी काढण्याचा आग्रह अनेकजण करतात. आम्ही चालता बोलता ऑर्केस्ट्रा असल्यामुळे अनेक जण गाण्याची फर्माईशदेखील करतात. आता आमचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे.लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. याचा फार अभिमान वाटतो.
-चेतन पाटील, कलाकार (स्वराधार )