संरक्षण उद्योगांचे खासगीकरण नाही
By admin | Published: April 22, 2016 12:59 AM2016-04-22T00:59:57+5:302016-04-22T00:59:57+5:30
देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
खडकी: देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
खडकीतील आलेगावकर विद्यालयात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने आयोजित केलेल्या १७व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बैजनाथ रॉय, प्रतिरक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र तिवारी, प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, उपाध्यक्ष के. एन. शर्मा, केंद्रीय कर्मचारी परिसंघाचे सचिव एम. पी. सिंह, सरचिटणीस साधू सिंह, उपाध्यक्ष मोहन राव, अरुण सूर्यवंशी, महामंत्री एम. पी. सिंग, एस. एन. पटवे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात अध्यक्ष बैजनाथ रॉय यांनी संरक्षण कामगारांचे प्रश्न मांडले. दारूगोळा कारखाने, संरक्षण उद्योगाचे खासगीकरण, वारसांना नोकरी, अॅप्रेंटिसशिप कामगारांना नोकरीत प्राधान्य, निर्धारित बोनस, नवीन कामगारांना ग्रॅच्युएटी पेन्शन द्या, अशा मागण्या केल्या. त्याची उत्तरे संरक्षणमंत्र्यांनी दिली. संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले, ‘‘दारूगोळा कारखान्यांनी चौदा हजार कोटींची उलाढाल पूर्ण केली आहे. उत्पादन क्षमता चांगली आहे. ही आपल्या देशाची आणि संरक्षण विभागाची ताकद आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला बळ मिळेल. उत्पादन क्षमता चांगली झाली आहे. आता आपल्याला उत्पादनात रिजेक्शन कमी, आपली उत्पादने एक्सपोर्ट कशी होतील, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. भरती प्रक्रिया सेंट्रलाइज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आऊटसोर्सिंग, कंत्राटी कामगार हे अडचणीचे विषय आहे. त्याचबरोबर अॅप्रेंटिसशिप कामगारांचा प्रश्नही सकारात्मकरीत्या सोडविला जाईल. सर्वांना खासगीकरणाची चिंता आहे. संरक्षण उद्योगांचे खासगीकरण केले जाणार नाही. त्यामुळे कामगारांनी निश्चिंत राहावे. सातवा वेतन आयोग आदी प्रश्नांचीही चिंता करू नये. ’’
संरक्षण मंत्री यांनी खासगीकरण होणार नाही, असे जाहीर करताच उपस्थितांमधून जोरात टाळ्यांची दाद देण्यात आली. रॉय यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संरक्षण कामगारांचे प्रश्न मांडले. तसेच संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण करू नये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. प्रशिक्षणार्थींना संरक्षण सेवेत रूजू करावेत, अश्या मागण्या केल्या.
(वार्ताहर)