म्हाडाच्या घरांचे विलंब शुल्क झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:14 AM2018-10-16T06:14:40+5:302018-10-16T06:14:54+5:30
व्याज कमी झाल्याने दिलासा : मुंबई मंडळाच्या आगामी लॉटरीपासून नवे दर लागू
मुंबई : म्हाडाच्या घरांच्या किमती ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय म्हाडाने याआधीच घेतला आहे. आता या घरांची रक्कम भरण्यास उशीर झाल्यानंतर आकारले जाणारे विलंब शुल्कही कमी केले जाणार आहे. यामुळे म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना दिलासा मिळेल.
म्हाडाच्या लॉटरीत घर लागल्यानंतर विलंब शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या ११ टक्के व्याजामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडत होता. मात्र आता हे व्याज कमी करण्यात आले आहे. नवे व्याजदर आगामी मुंबई मंडळाच्या लॉटरीपासून लागू होतील, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानुसार ११ टक्क्यांऐवजी आता रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटवर अनुक्रमे ०.५ टक्के, १ टक्के आणि २ टक्के असे व्याज आकारण्यात येईल.
म्हाडाच्या घरांच्या विजेत्यांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर त्यांना म्हाडाकडून देकार पत्र पाठवले जाते. ते मिळाल्यापासून पहिल्या ४५ दिवसांत घराच्या एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम विजेत्यांना भरावी लागते. तर उर्वरित ७५ टक्के रक्कम म्हाडाकडून दिलेल्या टप्प्यांत भरावी लागते. या टप्प्यांत पैसे भरले नाहीत, तर विजेत्यांच्या हातातून घर निसटू शकते. त्यामुळे विजेत्यांना १९५ दिवसांची मुदत देण्यात येते.
मात्र, मुदतवाढ खिशाला परवडणारी नसते. कारण म्हाडा ७५ टक्के घराच्या रकमेवर ११ टक्के व्याज आकारते. आधी साडेतेरा टक्के व्याज होते. त्यानंतर ते ११ टक्क्यांवर आणले आहे. मात्र ११ टक्के व्याजही भरमसाट असून यामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे व्याज कमी करावे, अशी मागणी सातत्याने विजेत्यांकडून करण्यात येत होती. ती लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
असे असतील व्याजदर
मुदतवाढीच्या पहिल्या १५ दिवसांत कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. त्याच्या पुढच्या ४५ दिवसांत बेस रेट आणि त्यावर ०.५ टक्के असे व्याज आकारण्यात येईल. तर त्यापुढच्या ६५ दिवसांसाठी बेस रेट आणि त्यावर १ टक्के आणि ७५ दिवसांवर बेस रेट आणि त्यावर २ टक्के असे व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.