सात जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये घट
By admin | Published: May 6, 2016 02:13 AM2016-05-06T02:13:08+5:302016-05-06T02:13:08+5:30
बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित
मुंबई : बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिली.
विदर्भातील सहा, मराठावाड्यातील आठ आणि सोलापूर अशा १६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महसूलमंत्री एकनाथ खडसे हे जळगाव येथून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. जलयुक्त शिवार योजनेची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यानेच आत्महत्या कमी होऊ शकल्या, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले.
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ८२ हजार अर्ज आलेले आहेत. या १६ जिल्ह्यांमध्ये त्यातील १३ हजार ६८० शेततळ्यांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
सुधींद्र कुलकर्र्णींची उपस्थिती!
- आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांची आजच्या
बैठकीतील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. मराठवाड्यातील दुष्काळाचा अभ्यास करून तयार केलेला अहवाल या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
- ओआरएफ संस्थेच्या अहवालातील प्रमुख शिफारशी अशा - स्वतंत्र दुष्काळ निवारण खाते निर्माण करावे, दुष्काळ जागृती अभ्यासक्रम सुरू करावा, नद्यांच्या प्रवाहांचे मॅपिंग करा, दुष्काळाशी संबंधित पदांना प्रतिष्ठा द्यावी, दुष्काळासंबंधीची माहिती आॅनलाइन करा, आजवरच्या सर्व उपाययोजनांचे आॅडिट करावे, ग्राहक गट आणि शेतकरी गटांची स्थापना करावी आदी.