शहरात गतवर्षीच्या तुलनेत आजारांत घट
By Admin | Published: August 3, 2016 05:42 AM2016-08-03T05:42:25+5:302016-08-03T05:42:25+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले
मुंबई : पावसाळ्यात शहरात आजार वाढले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
पावसाळ्यात विषाणूजन्य तापाचे रुग्ण वाढतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत २३७ने घट झालेली आहे. जुलै २०१६मध्ये मलेरियाचे ५८३ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. महिन्याभरात ६३ रुग्ण आढळून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत स्वाईन फ्लूने डोके वर काढले होते. स्वाईन फ्लूची साथ गेल्या वर्षीही मुंबईत होती. पण यंदा एकच रुग्ण आढळला आहे. काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, जुलैमध्ये १३५ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)
>एडिस डासाची वैशिष्ट्ये : डेंग्यूची लागण ही एडिस डासाच्या मादीमुळे होते.
या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात म्हणून या डासांना ‘टायगर मॉस्क्युटो’ असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे या डासाचा धोका फक्त घरातच नाही, तर शाळा, कॉलेज, कार्यालय, हॉटेल्स, मॉल, स्टेशन अशा सर्व ठिकाणी आहे. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामध्ये पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास, अळ्या असलेली भांंडी घासून-पुसून स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे भांड्यांच्या पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील.
>अशी घ्या काळजी
पावसाळ्यात कोणताही
ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो, त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अति जोखमीच्या व्यक्तींनी (उदा : शेतात काम करणारे, जनावरांची देखभाल करणारे, सफाई कामगार) काळजी
घेणे आवश्यक आहे.
पायाला जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे. किंवा गमबुटांचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. उंदीर-घुशींचा नायनाट करावा.
उंदीर नियंत्रणासाठी स्वच्छता, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावेत. घरात आणि आजूबाजूला कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी, कचऱ्याची विल्हेवाट लावावी. ट्रेकिंग टाळावे.