तब्बल ६० कर्मचाऱ्यांची पदावनती
By admin | Published: May 5, 2017 04:08 AM2017-05-05T04:08:03+5:302017-05-05T04:08:03+5:30
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील तब्बल ६० कर्मचारी/अधिकाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे
मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील तब्बल ६० कर्मचारी/अधिकाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे. पदोन्नतीच्या काळात जास्तीच्या दिल्या गेलेल्या २ कोटी २५ लाख रुपयांची वसुली त्यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम हे आघाडी सरकारच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष असताना २०११ ते २०१३ या काळात हा पदोन्नती घोटाळा घडला होता. महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करताना ‘लोकमत’ने या घोटाळ्यावरदेखील प्रकाश टाकला होता. पदोन्नतीच्या निकषात न बसणाऱ्यांना पदोन्नती बहाल करण्यात आली होती. आधी इंगळे आणि नंतर एस. के. बावणे हे त्या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. इंगळे हे रमेश कदमप्रमाणेच आर्थर रोड जेलची हवा खात आहेत. मात्र, बावणे अजूनही फरार आहेत.
नियमबाह्य पदोन्नती मिळालेल्या ६० कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१५मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. शिवाय, महामंडळानेही तपासणी केली. ही तपासणी आणि कर्मचाऱ्यांनी नोटिशींना दिलेली उत्तरे यातून नियमबाह्य पदोन्नतीवर शिक्कामोर्तब झाले. नोकरी वाचविण्याच्या धडपडीपोटी या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमबाह्य पदोन्नतीच्या काळात मिळालेल्या जादाच्या वेतनाची रक्कम महामंडळाकडे भरण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम प्रत्येकी तीन लाख ते १० लाख रुपयांच्या घरात आहे.
आता या कर्मचारी/अधिकाऱ्यांना पुढील महिन्यापासून त्यांच्या पदोन्नतीच्या आधीच्या पदाचे वेतन पुढील महिन्यापासून दिले जाईल. त्यामुळे महिन्याकाठी महामंडळाचे किमान १५ लाख रुपये वाचणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांना मिळणाऱ्या वाढीव आर्थिक लाभापैकी ५० टक्के रक्कम ही महामंडळातील घोटाळेबाजांना या कर्मचाऱ्यांकडून मिळत होती, असे म्हटले जाते. (विशेष प्रतिनिधी)
पदोन्नतीसाठी अनेक प्रकारचा बनाव
पदोन्नती नियमात बसविण्यासाठी अनेक प्रकारचा बनाव करण्यात आला. एखाद्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या तारखेच्या दोन-तीन वर्षे आधीचा मानीव दिनांक (नोशनल डेट) दाखविला जायचा.
च्जेणेकरून त्याची सेवाज्येष्ठता दिसेल आणि त्याला पदोन्नती दिली जाऊ शकेल. सेवेची तीन वर्षे पूर्ण न केलेल्यांनादेखील पदोन्नतीची खिरापत वाटण्यात आली होती.