पाटोळे यांचे केईएममध्ये देहदान
By admin | Published: May 13, 2015 01:45 AM2015-05-13T01:45:08+5:302015-05-13T01:45:08+5:30
आई रिटायर होतेय, जाऊबाई जोरात, श्यामची मम्मी, झोपा आता गुपचूप यांसारखी गाजलेली नाटके आपल्या लेखणीतून उतरवणारे ज्येष्ठ नाटककार व लेखक अशोक पाटोळे
मुंबई : आई रिटायर होतेय, जाऊबाई जोरात, श्यामची मम्मी, झोपा आता गुपचूप यांसारखी गाजलेली नाटके आपल्या लेखणीतून उतरवणारे ज्येष्ठ नाटककार व लेखक अशोक पाटोळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. मंगळवारी पहाटे जसलोक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे पार्थिव केईएम रुग्णालयाकडे सोपविण्यात आले.
१९७१मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही एकांकिका लिहिली आणि तिथून त्यांच्या नाट्यप्रवासाला प्रारंभ झाला. त्यानंतर मराठी रंगभूमीवर त्यांनी एकाहून एक सरस अशी नाटके दिली. यात मी माझ्या मुलांचा, श्यामची मम्मी, जाऊबाई जोरात, झोपा आता गुपचूप, प्रा. वाल्मीकी रामायण, देखणी बायको दुसऱ्याची, हीच तर प्रेमाची गंमत आहे, एक चावट संध्याकाळ आणि अलीकडेच आलेले आई तुला मी कुठे ठेवू? अशा नाटकांचा समावेश आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हा त्यांचा विनोदी कथासंग्रह गाजला. तसेच ‘पाटोळ्याच्या पाटोळ्या’ हा काव्यसंग्रहही त्यांच्या नावावर आहे. ‘एक जन्म पुरला
नाही’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशन मार्गावर होते. काही दिवसांतच या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार होते. हसरते, अधांतर अशा दूरचित्रवाणी मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते.