तुकोबांच्या पालखी सोहळ्यास देहूकरांचा निरोप
By admin | Published: June 18, 2017 12:23 AM2017-06-18T00:23:05+5:302017-06-18T00:23:05+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वैष्णवांच्या जनसागरासह शनिवारी सकाळी आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
- लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव (पुणे) : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वैष्णवांच्या जनसागरासह शनिवारी सकाळी आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळी ११च्या सुमारास इनामदारवाड्यातून सोहळा बाहेर पडला. साडेअकराच्या सुमारास पालखी महाद्वार प्रवेशद्वार कमानीमध्ये (वेस) आल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाचा गजर आणि पखवाजाचा ठेका धरला.
पालखी कापूरओढा येथील अनगडशहावली दर्ग्याजवळ आल्यानंतर पहिली अभंग आरती बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. आरती होताच परिसरातील भाविक पालखीला भक्तिभावाने निरोप देऊन माघारी फिरले. दुपारी २च्या सुमारास पालखी चिंचोली येथील शनि मंदिराजवळ आल्यानंतर पहिल्या विसाव्यासाठी थांबली. येथून विसावा घेतल्यानंतर पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. पोलिसांनी पालखीभोवती दोर लावलेला असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. पालखीचे दर्शन घेता न आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.
पालखी मार्गावर विविध संस्थानी भाविकांना अन्नदान, फळांचे व बिस्किटांचे वाटप केले. देहूगाव येथील शिरिषकुमार मंडळ, दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर यांनी अन्नदान केले. माळीनगर येथे सरपंच टिळेकर यांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.
पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचला पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले़