देहूरोड रस्ता चौपदरीकरण रखडले

By admin | Published: September 20, 2016 02:15 AM2016-09-20T02:15:12+5:302016-09-20T02:15:12+5:30

उड्डाणपूल बांधण्याच्या कामास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सोमवारी सकाळपासून येथे बेमुदत धरणे आंदोलन

Dehuroad road retreated fourteen | देहूरोड रस्ता चौपदरीकरण रखडले

देहूरोड रस्ता चौपदरीकरण रखडले

Next


देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे निगडी ते देहूरोडदरम्यानचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल बांधण्याच्या कामास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सोमवारी सकाळपासून येथे बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले.
काम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित रस्त्याचे काम सुरू करण्याची तारीख जाहीर करून तसे पत्र द्यावे व देहूरोड येथील रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविल्याची सर्व कागदपत्रे सादर करण्याची मागणी आंदोलकांनी या वेळी उपस्थित महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याबाबत पूर्तता न झाल्याने धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयादरम्यान उड्डाणपूल बांधण्यास दिरंगाई होत असून, गेल्या काही वर्षांत महामंडळाकडून अनेकदा काम सुरू करण्याबाबत लेखी व तोंडी आश्वासने मिळूनही अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.
परिणामी या अरुंद रस्त्यावर अपघात सत्र सुरू असून, त्यात आजतागायत ३५० हून अधिक बळी गेले असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व शासन यांच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली मंचाचे सभासद, काही पक्षांचे कार्यकर्ते व विविध संस्था, संघटना यांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी दहापासून महामार्गालगत जुन्या बँक आॅफ इंडिया चौकात धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. सकाळी देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदिनाथ महानवर व पोलीस कर्मचारी योगेश जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दिवसभरात रस्ते विकास महामंडळाचा
एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याची माहिती समोर आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Dehuroad road retreated fourteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.