देहूरोड बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: October 18, 2016 01:38 AM2016-10-18T01:38:33+5:302016-10-18T01:38:33+5:30
सचिन शेळके यांच्या हत्येच्या निषेधार्थ देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाने केलेल्या आवाहनानुसार देहूरोड बाजारपेठ बंद ठेवण्यात आली
देहूरोड : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येच्या निषेधार्थ देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाने केलेल्या आवाहनानुसार देहूरोड बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. देहूरोड बंदला प्रतिसाद मिळाला. मात्र, परिसरातील शाळा व बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतून काळे झेंडे घेऊन निषेध फेरी काढली होती. कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे महामार्ग काही काळ रोखून धरला होता. सुभाष चौकात झालेल्या निषेध सभेत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करून शेळके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बाजारपेठ सोमवारी बंद ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियाचा माध्यमातून रविवारी सायंकाळी करण्यास सुरुवात झाली होती. हत्येच्या निषेधार्थ मुख्य चौकात बाजार बंदच्या आवाहनाचा फलक लावण्यात आला होता. त्यानुसार बाजारपेठ, तसेच महात्मा फुले मंडई पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळी १०पासून भाजपाचे पदाधिकारी, बोर्ड सदस्य व कार्यकर्ते सुभाष चौकात आल्यानंतर निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर चौकात झालेल्या निषेध सभेत भाजपा शहराध्यक्ष अॅड. कैलास पानसरे, बोर्डाच्या उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण, प्रदीप बेंद्रे व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष संजय धुतडमल यांनी निषेध नोंदविला.
या वेळी बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, सारिका नाईकनवरे, माजी शहराध्यक्ष महावीर बरलोटा, उमेश जैन, कामगार नेते लहू शेलार, बाळासाहेब झंजाड, बाळासाहेब शेलार, अमित
छाजेड, अंजनी बत्तल, अमोल नाईकनवरे, सूर्यकांत सुर्वे, रोहन गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाजारपेठेत निषेधाचे फलक लावण्यात आले
होते . (वार्ताहर)
>लोणावळ्यात सचिन शेळके यांना श्रद्धांजली
लोणावळा : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा रविवारी तळेगावात काही समाजकंटकांनी धारदार शस्त्रांनी भर चौकात वार करून खून केला. या घटनेचा निषेध नोंदवत शेळके यांना सोमवारी लोणावळा शहर भाजपाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाजीमहाराज चौकात शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी हल्ल्याचा निषेध नोंदवत आरोपींना भर चौकात फाशी द्या, अशी मागणी केली. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेवक श्रीधर पुजारी, बाळासाहेब जाधव, अपर्णा बुटाला, अरुण लाड, हर्षल होगले, दादा धुमाळ, यमुना साळवे, अश्विनी जगदाळे, योगिता कोकरे, परिजा भिल्लारे, शशिकांत मानकर, देविदास कडू, सुनील तावरे आदी उपस्थित होते.