देहूरोड बाजारपेठेत चालताही येईना!

By admin | Published: October 31, 2016 01:51 AM2016-10-31T01:51:49+5:302016-10-31T01:51:49+5:30

खाद्यपदार्थ व इतर साहित्याची विक्री करणाऱ्या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले

Dehurod market can not run! | देहूरोड बाजारपेठेत चालताही येईना!

देहूरोड बाजारपेठेत चालताही येईना!

Next


देहूरोड : दिवाळीनिमित्त शनिवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या केलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर साहित्याची विक्री करणाऱ्या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. चालणेही मुश्कील बनले होते. गेल्या महिन्यात होणारी अतिक्रमण हटाव कारवाई दिवाळीच्या कारणाने पुढे ढकलली असताना रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना व वाहनचालकांना शिस्त लागली नसल्याचे दिसले.
देहूरोड कॅन्टोन्मेन्टच्या सभागृहात सहा आॅक्टोबरला झालेल्या बोर्ड प्रशासन, पोलीस व बोर्ड सदस्य यांच्या संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार वाढत्या अतिक्रमणांमुळे बाजारपेठ व मुंबई-पुणे महामार्ग परिसरात वाहतूककोंडी व चालणे मुश्कील होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते. कारवाईचे नियोजन करण्यात येत होते. दरम्यान, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत बैठकीचे बोलविली. अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होत असल्याने व्यापाऱ्यांनी अडथळे व अतिक्रमण काढून टाकण्याचे आवाहन बैठकीत केले होते. काहींच्या मनमानीमुळे सर्व व्यापाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त झाली होती. चर्चेअंती दिवाळीपर्यंत कारवाई टाळण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांना करण्याचा आणि स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात करावी, असा निर्णय घेतला होता. रस्त्यावर हातगाड्या छोटे व्यावसायिक, पथारीवाले व्यवसाय करीत असल्याने, काही व्यापाऱ्यांनी पदपथावर अतिक्रमणे केली असल्याने ग्राहकांना पायी चालता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कॅन्टोन्मेन्ट व पोलिसांनी कारवाई केल्याशिवाय शिस्त लागणे अशक्य असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहक इतरत्र खरेदीसाठी जाऊ लागल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. (वार्ताहर)
>सूचनांकडे दुर्लक्ष : दोन दिवसच शिस्त
देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने गेल्या पंधरवड्यात दररोज देहूरोड बाजारपेठ परिसरात ध्वनिक्षेपकावरून अतिक्रमण हटविण्याबाबत सूचित करण्यात येत होते. काही व्यापाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर आलेली दुकाने हटवून मागे घेत मुख्य रस्ते खुले करण्याला प्राधान्य दिल्याचे चित्र पहिले दोन-तीन दिवस दिसून आले.
मात्र, बाजारपेठेत पुन्हा मागचे पाढे पंचावन दिसत असून, बाजारपेठेतील रस्ते अडथळामुक्त ठेवण्याबाबत बोर्डाकडून काळजी घेण्यात येणार असून, परिणामी दिवाळी सणानंतर कोणत्याही दिवशी कारवाईस सुरुवात करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Dehurod market can not run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.