‘एमपीएससी ’त उत्तीर्ण होवूनही आठ महिन्यांपासून नियुक्तीला विलंब ; उमेदवारांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 07:56 PM2019-02-23T19:56:14+5:302019-02-23T20:00:15+5:30
उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 8 महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रशासकीय सेवेत रुजू करून घेतले गेले नाही.त्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेमध्ये राज्यातील अनेक उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, पोलीस उपधीक्षक, तहसीलदार आदी पदांवर निवड झाली आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे या उमेदवारांना गेल्या आठ महिन्यांपासून घरी बसावे लागले आहे. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होवूनही 1 ऑगस्ट 2018 पासून अनेक भावी अधिकारी प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातील काही उमेदवारांनी आपली पूवीर्ची नोकरी सोडून दिल्याने त्यांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच काही उमेदवार मानसिक ताण तणावाखाली आहेत.त्यामुळे या उमेदवारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि शासनाने सेवेत लवकर रुजू करून घ्यावे,या मागणीसाठी आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहित घोषित होण्याच्या अगोदर राज्य सरकारने उमेदवारांच्या प्रशिक्षणाबाबत आणि नियुक्तीसंदर्भात निर्णय घ्यावा,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबिय आझाद मैदानात केल्या जाणा-या आंदोलनात सहभागी होणार आहेत.