‘एफआयआर’ नोंदवण्यास विलंब का?

By Admin | Published: July 11, 2017 05:55 AM2017-07-11T05:55:41+5:302017-07-11T05:55:41+5:30

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास विलंब का झाला? एफआयआर नोंदवण्याची वेळ कैद्यांवर का आली?

Delay in filing FIR? | ‘एफआयआर’ नोंदवण्यास विलंब का?

‘एफआयआर’ नोंदवण्यास विलंब का?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास विलंब का झाला? एफआयआर नोंदवण्याची वेळ कैद्यांवर का आली? आणि तिला रुग्णालयात नेण्यास विलंब का झाला? अशी प्रश्नोत्तरांची सरबत्ती उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर करत येत्या दोन आठवड्यांत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भायखळा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेट्येवर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. मात्र हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, यासाठी संजय भालेकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. ‘हा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. ही कारागृह प्रशासनाची जबाबदारी होती. तिच्या (मंजुळा शेट्ये) मृत्यूनंतर तुम्ही काय पावले उचललीत? ते आम्हाला सांगा,’ असे न्यायालयाने म्हटले. आरोपींवर भारतीय दंडसंहिता ३७७ (अनैसर्गिक लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी भालेकर यांनी केली आहे. त्यावर आरोपींवर आयपीसी कलम ३७७ अंतर्गत गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये, याबाबतही नमूद करावे, असेही न्यायालयाने सरकारला सांगितले. शवविच्छेदन अहवाल वाचल्यानंतर न्यायालयाने मंजुळाच्या शरीरावर इतक्या जखमा कशा झाल्या, याचीही माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यास राज्य सरकारला सांगितले. त्यावर सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी सहा आरोपींना अटक केली असून, खातेनिहाय चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने यावरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.
>शवविच्छेदन अहवालात फेरफार
मंजुळा शेट्येच्या शवविच्छेदनाच्या अहवालात फेरफार केल्याचा आरोप करत तक्रारदार मरियम शेख हिने सोमवारी न्यायालयात धाव घेतली आहे. जे.जे. रुग्णालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप तिने याचिकेत केला आहे. वॉर्डन मंजुळा शेट्येला २३ जुलै रोजी भायखळा कारागृहात झालेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची तक्रार सहकैदी मरियम शेखने दिली होती.तिच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात जेलर मनीषा पोखरकरसह सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. मंजुळाला मारहाण करतानाच तिच्या गुप्तांगात काठी घातल्याचे मरियने तक्रारीत म्हटले होते. मात्र जे.जे. रुग्णालयाच्या प्राथमिक शवविच्छेदनाच्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला नाही. तसेच पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कारागृहाच्या वतीने राज्य महिला आयोगाला सादर केलेल्या चौकशी अहवालात मंजुळाच्या गुप्तांगात जखमा नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा आरोप मरियम शेखने केला आहे. तिच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी किल्ला कोर्टात याचिका दाखल केली आहे. कारागृह प्रशासन आणि जे.जे. रुग्णालयाने संगनमताने शवविच्छेदनानंतरचा वैद्यकीय अहवाल बदलल्याचे शेख हिने तक्रारीत म्हटले आहे. मंजुळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वीच स्वाती साठे आणि जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यात फोनवरून बोलणे झाले होते. त्यामुळे दोघांचे फोन रेकॉर्ड तपासावेत. स्वाती साठे यांची नार्को, ब्रेनमॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करावी, अशी मागणी शेखच्या वतीने सातपुते यांनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच या तक्रार अर्जामध्ये राज्य शासन, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, डॉ. तात्याराव लहाने, कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अखिलेशकुमार सिंग, भायखळा कारागृहाचे अधीक्षक सी. इंदुलकर, भायखळा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. खान यांना प्रतिवादी केले आहे.
महिला कैदी शेख हिने केलेल्या या गंभीर आरोपांवर १४ जुलैला तपास अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मरियम शेखच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळणार आहे.
गुन्हे शाखेची बाराही पथके करणार चौकशी
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणासह दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेचे कक्ष ३ करत आहे. भायखळा कारागृहातील २९१ कैद्यांचे जबाब नोंदविण्यासाठी त्यांना कारागृहातून परवानगी मिळत नाही. येथील कैदी महिलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेण्यात आली आहे. त्या माहितीच्या वर्गवारीनुसार ती मुंबईतील कुठल्या कक्षाअंतर्गत येते त्याची वर्गवारी करत त्यानुसार ती माहिती मुंबईतील बाराही कक्षांना वर्ग केली आहे. त्या वर्गवारीनुसार संबंधित कैद्यांचे जबाब गुन्हे शाखेचे प्रत्येक युनिट घेणार आहे.
‘स्वाती साठेंवर गुन्हा नोंदवा’
स्वाती साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांनी नागपाडा पोलिसांकडे अर्ज केला आहे. तसेच साठे यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी सोमवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची त्यांनी भेट घेतली.

Web Title: Delay in filing FIR?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.