अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर; बच्चू कडू यांचा सरकारलाही घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:27 PM2023-11-02T18:27:20+5:302023-11-02T18:27:29+5:30
आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे.
आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले होते. आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. याचदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे.
अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर झाला आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा नक्षलवादी नाहीत, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. प्रमाणपत्र देण्यात अधिकाऱ्यांनी घोळ केला आहे. मराठा हा कुणबी आहे व त्याचे काम हे कुणबीचेच आहे. कुणबी म्हणून जर त्यांनी प्रमाणपत्र देत नसतील तर मराठा कोण आहे हे सरकारने सांगावे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मंत्रालयात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी मराठा समाजातील आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रालय परिसरात आमदारांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतले. याठिकाणी आमदार रोहित पवार म्हणाले की, सत्ताधारी-विरोधी आमदार मराठा समाजाला न्याय मिळावा, जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी सर्वच आंदोलन करतायेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु ते प्रयत्न करत आहेत. सरकारने लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगेंशी चर्चा करावी. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे ते उपोषण मागे घेतील यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली.