विलंबाच्या रिडिंगमुळे ग्राहकांना फटका
By admin | Published: May 20, 2016 02:33 AM2016-05-20T02:33:54+5:302016-05-20T02:33:54+5:30
वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे
पिंपरी : वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सांगवी विभागातील महावितरणच्या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना बसला असून, यास कारणीभूत असणाऱ्या बिलांचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून नागरिकांचे पैसे परत करावेत, अशी मागणी होत आहे.
महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते. वीजबचतीच्या अनेक उपाययोजना करूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा रिडिंग घेतल्याने दुप्पट ते तिप्पट रकमेचे बिल भरावे लागत आहे. या महिन्यात आलेली बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे झाले आहेत. याबाबत ‘वाढीव बिलांमुळे नागरिकांना शॉक’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
नियमित योग्य प्रमाणात वापर असूनही केवळ उशिरा रिडिंग घेतल्याने नागरिकांना दुप्पट ते तिप्पट दराच्या वाढीव बिलाचा भार पेलावा लागतो. बिल मुदतीनंतर मिळाले किंवा मिळालेच नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यास दखल घेतली जात नाही. महावितरणच्या आॅनलाइन संकेतस्थळावर तपासा, मोबाइल अॅप डाऊनलोड करून घ्या, कॉल सेंटरशी संपर्क साधा, अशी उत्तरे नागरिकांना देण्यात येतात. याबाबचे वृत्त प्रकाशित केल्यानंतरही अधिकारी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून बिलिंगचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.
वीज वापराचा स्लॅब ठरवून दिला आहे. मात्र, मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या दहा तारखेच्या आत रिडिंग घेणे अपेक्षित असताना दहा ते बारा दिवस उशिराने रिडिंग घेतले. त्यामुळे बिल दुप्पट आले आहे. बिलिंगचे काम खासगी ठेकेदाराकडे दिले आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. वाढीव बिले रद्द करून नवीन बिले द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सांगवी विभागातील वाढीव रिडिंगची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. दोन महिन्यांची तुलना केली असता, ही वाढ ४० ते ५० टक्के असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)