तीन महिन्यांचा विलंब; तरीही नालेसफाई संथच
By admin | Published: May 3, 2015 04:59 AM2015-05-03T04:59:35+5:302015-05-03T04:59:35+5:30
तीन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही़ त्यामुळे आठवडाभरानंतर जेमतेम १८ टक्केच गाळ
मुंबई : तीन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही़ त्यामुळे आठवडाभरानंतर जेमतेम १८ टक्केच गाळ नाल्यांमधून काढण्यात आला आहे़ अनेक वॉर्डांमध्ये अद्याप पालिकेची यंत्रणा पोहोचलेली नाही़ त्यामुळे ३१ मेपर्यंत नाल्यांमधील सर्व गाळ काढला जाण्याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे़
गाळामुळे नाल्यांमधून पाणी वाहून जात नाही़ त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईतील अनेक भाग दरवर्षी पाण्याखाली जातात़ हे चित्र बदलण्यासाठी पावसाळ्यापूर्वी तीन महिने आधी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात नालेसफाईला सुरुवात होणे अपेक्षित होते़ मात्र नाल्यांच्या सफाईचे कंत्राट १५ एप्रिल रोजी देण्यात आले़
विशेष म्हणजे मिठी नदी आणि नालेसफाईकरिता दोन वर्षांसाठी एकूण २८५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे़ ठेकेदार ३८ टक्के कमी खर्चात काम करण्यास तयार असल्याने या कामाच्या दर्जाबाबतही साशंकताच आहे़ त्यात हे काम एप्रिलअखेरीस सुरू झाल्याने ३१ मेपूर्वी काम उरकण्यासाठी ठेकेदार नालेसफाईतही हातचलाखी दाखवतील, अशी भीती व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)