शिष्टमंडळांना विधिमंडळात ‘नो एन्ट्री’
By Admin | Published: July 14, 2015 12:09 AM2015-07-14T00:09:54+5:302015-07-14T00:09:54+5:30
राज्यातील कोणत्याही शिष्टमंडळाला विधिमंडळ अधिवेशनाच्या कार्यकाळात विधान भवनात येऊन मंत्री, अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.
- यदु जोशी, मुंबई
राज्यातील कोणत्याही शिष्टमंडळाला विधिमंडळ अधिवेशनाच्या कार्यकाळात विधान भवनात येऊन मंत्री, अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या काळात मंत्र्यांनी ब्रिफिंगसाठी अधिकाऱ्यांना आपल्या दालनात न बोलविता त्यांच्या निवासस्थानी बोलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विधिमंडळ सचिवालयाने काढलेल्या या आदेशाने मंत्र्यांची पंचाईत होऊ शकते. बरेचदा विधिमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी मंत्री हे अधिकाऱ्यांना विधान भवनातील आपल्या कक्षात बोलावून घेतात. बरेचदा मंत्री सभागृहात जाईपर्यंत ब्रिफिंग घेत असतात. आता त्यांना तसे करता येणार नाही.
अधिवेशन काळात विधिमंडळावर येणारे बहुतेक सर्व मोर्चे आझाद मैदानापर्यंत येतात आणि त्या ठिकाणी मंत्री मोर्चाला सामोरे जातात किंवा मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीसाठी विधान भवनात येते.
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूस एक मंडप टाकलेला असतो. त्या मंडपात मंत्री मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटतात किंवा शिष्टमंडळाला विधान भवनातील आपल्या दालनात भेटीसाठी बोलवितात, अशी आतापर्यंतची पद्धत होती. मात्र आता मोर्चेकऱ्यांच्या वा इतर कुठल्याही शिष्टमंडळाला विधान भवनात येऊन मंत्र्यांची भेट घेता येणार नाही.
पीठासीन अधिकारी व
विरोधी पक्षनेते यांना रोज १० प्रवेशपत्रिका देण्यात येतील. मंत्री/राज्यमंत्री यांना दैनंदिन
पाच प्रवेशपत्रिका छायाचित्रांसह
(वेब कॅमेऱ्याने काढलेल्या) देण्यात येतील. या प्रवेशपत्रिका संबंधित मान्यवरांच्या स्वाक्षरीने अथवा खासगी सचिवांच्या सहीचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच वितरीत करण्यात येणार आहेत.
ुवाढत्या गर्दीवर उपाययोजना
विधान भवन इमारतीमध्ये होणाऱ्या वाढत्या गर्दीमुळे प्राथमिक सुविधांवर पडणारा ताण कमी व्हावा तसेच सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी अगदी आवश्यक तेवढेच अधिकारी/ कर्मचाऱ्यांना आणि अभ्यागतांना विधान भवन प्रवेशपत्रिका देण्यात येणार आहेत.