जाचक अटी लादणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना हटवा
By admin | Published: March 7, 2016 03:31 AM2016-03-07T03:31:40+5:302016-03-07T03:32:12+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर आणि गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटी आणि त्या विरोधातील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण, या पार्श्वभूमीवर
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर आणि गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटी आणि त्या विरोधातील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण, या पार्श्वभूमीवर कोकणातील भाजपा-शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जाणीवपूर्वक हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.
काँग्रेसने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचे प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत या नेत्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. या वेळी राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, भाजपा प्रवक्ता माधव भांडारी, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार, संदेश पारकर आदी नेते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर झालेल्या लाठीहल्ल्यात वैभव नाईक, राजन तेली, तसेच भाजपा तालुकाध्यक्षांना मारहाण झाली. मुख्यमंत्र्यांना याबद्दल नाराजी दर्शविली आहे, असे माधव भांडारी म्हणाले, तसेच मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी कोकण विभागीय आयुक्त तानाजी संत्रे यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे. येत्या चार दिवसांत ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार असल्याचे भांडारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सहकार्याने काँग्रेसने गुंड आणून कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना-भाजपाने केला आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांची यंत्रणा जाचक अटी लादून व्यावसायिकांना नाहक त्रास देत आहे. बाँड दिल्यानंतरही जप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.