शाळा परिसरातील टपऱ्या हटवा
By admin | Published: April 27, 2015 04:02 AM2015-04-27T04:02:23+5:302015-04-27T04:02:23+5:30
शाळा, महाविद्यालयाच्या ९० मीटरच्या परिसरात पानटपऱ्या असल्यास शिक्षकांनी अथवा पालकांनी शिक्षण विभागाकडे ई-मेल, पत्राद्वारे त
मुंबई : शाळा, महाविद्यालयाच्या ९० मीटरच्या परिसरात पानटपऱ्या असल्यास शिक्षकांनी अथवा पालकांनी शिक्षण विभागाकडे ई-मेल, पत्राद्वारे तक्रार नोंदवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
इंडियन कॅन्सर सोसायटीचा ६४ वा वर्धापन दिन शनिवारी २५ एप्रिलला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘बी स्मार्ट, डोन्ट सार्ट’ ही शॉर्टफिल्म विनोद तावडे आणि अभिनेता वरूण धवन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. यावेळी तावडे बोलत होते.
शाळा, महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआमपणे विक्री असल्यामुळे विद्यार्थी दशेतच अनेकांना व्यसन जडते. लहान वयात मुले चोरून धूम्रपान करू लागतात. व्यसनांचे प्रमाण वाढल्यास भविष्यातील पिढीचे आरोग्य धोक्यात येते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या टपऱ्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. पण, यात शिक्षक, पालकांचा देखील सक्रिय सहभाग असावा. मुलांमध्ये जनजागृती व्हायला
पाहिजे. त्यासाठी ही शॉर्टफिल्म महत्त्वाची आहे, असेही तावडे यांनी नमूद केले.
अभिनेता वरूण धवनने यावेळी स्वत:चा अनुभव सांगितला. तो म्हणाला, मी एक अभिनेता आहे. यामुळे मला एखाद्या व्यक्तिरेखेसाठी धूम्रपान करावे लागते. पण प्रत्यक्षात मी नेहमीच धूम्रपानापासून लांब राहतो. धूम्रपान धोकादायक असल्याचे मला लहान वयातच समजले. धूम्रपान आरोग्यास हानिकारक असल्याने करू नये, असे सगळीकडेच बोलले जाते. पण, प्रत्यक्षात हा वैयक्तिक निर्णय असतो. म्हणून प्रत्येकाने स्वत: धूम्रपानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला
पाहिजे.
अनेकजण हे लहान वयातच मित्र मैत्रिणींच्या दबावामुळे धूम्रपानाच्या आहारी जातात. यामुळेच अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. विशीपर्यंतच मुलांना धूम्रपानाचे व्यसन जडते. तिशीच्या आसपास अथवा तिशी उलटल्यावर साधारणत: हे व्यसन जडत नसल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. अनिल डिक्रूझ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)