खडसे यांना मंत्रिपदावरून हटवा
By admin | Published: June 3, 2016 03:29 AM2016-06-03T03:29:16+5:302016-06-03T03:29:16+5:30
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वारंवार फोनवर संपर्क झाला असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला
कोल्हापूर : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वारंवार फोनवर संपर्क झाला असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाकावे, शिवाय त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हाही नोंदविला गेला पाहिजे, अशी
मागणी माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
संभाषणाचे प्रकरण अंगलट आल्यावर दाऊदने खडसे यांना धमकीचे फोन केले होते, असा खुलासा केला जात आहे. जर खरेच धमकीचे फोन असतील, तर मग खडसे यांनी पोलिसांत ‘एफआयआर’ का दाखल केला नाही? ज्या महिन्यात दाऊदचे फोन झाले, त्या महिन्यात फोन बंद होता, असे खडसे
म्हणतात. मग त्याच महिन्यात
त्यांचे फोनचे बिल १३०० रुपये कसे आले? असे प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)
अण्णांची सावध भूमिका
पारनेर (जि. अहमदनगर) : मी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. परंतु सबळ पुराव्याशिवाय कधीही बोललो नाही. एकनाथ खडसे यांच्याविषयी माझ्याकडे जोपर्यंत सबळ पुरावे नाहीत तोपर्यंत केवळ हवेत बोलणे योग्य होणार नाही, अशी सावध भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या पथकाने बुधवारी (दि. १) सनातन संस्थेच्या साधकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. जर सनातन संस्थेवर तुमचा संशय होता, तर मग इतके दिवस सीबीआय झोपले होते का? असा सवाल करून सनातन संस्थेला क्लीन चिट देण्याचा हा प्रकार असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला.
या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचा आमचा ठाम संशय होता. म्हणूनच आम्ही सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठविला होता, असेही त्यांनी सांगितले.