कार्यक्रम उधळणे हा राष्ट्रवाद नव्हे
By admin | Published: October 29, 2015 12:42 AM2015-10-29T00:42:43+5:302015-10-29T09:46:38+5:30
आम्हाला कुणी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. आमचा जन्म संघाच्या राष्ट्रभक्तीतून झाला आहे. कार्यक्रम उधळून लावले म्हणजे राष्ट्रवाद होत नाही
डोंबिवली : आम्हाला कुणी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. आमचा जन्म संघाच्या राष्ट्रभक्तीतून झाला आहे. कार्यक्रम उधळून लावले म्हणजे राष्ट्रवाद होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेचा समाचार घेतला. कल्याण-डोंबिवलीत घेतलेल्या तीन प्रचार सभांमध्ये ते बोलत होते. तुम्ही काय आम्हाला राष्ट्रवाद शिकवता? असा सवाल शिवसेनेला केला. आज या निवडणुकीचा विषय काय? विकासाच्या आधारावर तोंड दाखवायला जागा नाही. केलेली कामे त्यांना दाखवता येत नाहीत, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून केली.
पूर्वी युनोमध्ये भारताचे पंतप्रधान जाऊन रडायचे. आता पाकिस्तानचा पंतप्रधान तिथे जाऊन रडतो. ही नरेंद्र मोदींची ताकद आहे. तुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला स्मार्ट शहर करून दाखवण्याचे वचन देतो. दिल्लीत आपली सत्ता आहे. बिहारमध्ये येणार आहे. मग, कल्याण-डोंबिवली का मागे ठेवायची? इथेही आपली सत्ता हवी. दुसऱ्यांच्या हाती सत्ता दिली तर काही मिळणार नाही. पण, आमच्या हाती दिली तर काय मिळेल, त्याचे पॅकेज आधीच जाहीर केले आहे. या वेळी संधी द्या, असे आवाहन त्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केले. खासदार रामदास आठवले हे ज्या बाजूने असतात, त्याच बाजूचा विजय होतो. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होते, तोपर्यंत त्यांनी सत्ता उपभोगली. मात्र, आता त्यांनी त्यांची साथ सोडली, भाजपचा विजय झाला. या ठिकाणीही महायुतीचाच झेंडा आणि महापौर भाजपचा हवा.
आमचे मित्र १५ वर्षे या महापालिकेत होते. या काळात त्यांनी कल्याणचे काय ‘कल्याण’ केले, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी घेतला. या ठिकाणी एकही अद्ययावत उद्यान तयार करू शकले नाही, याचे कारण विकास आराखड्यामध्ये आम्हाला काय मिळेल, यावर त्यांचे लक्ष असते. जनतेला काय मिळेल, याकडे नाही. आम्हाला टीका करायची नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शहर आम्ही बनविणार. पाणीसमस्या, वाहतूककोंडी, रेल्वे, डम्पिंग ग्राउंडसमस्या सोडवण्याचा आराखडा तयार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले आहे. अशा अधिकारी, लोकप्रतिनिधींना आता जेलची हवा खावी लागणार, असा इशारा त्यांनी दिला. काही लोक निवडणुका आल्या की, भावनिक आवाहन करतात. मात्र, निवडणुकीनंतर त्यांचा चेहराही दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)