शेट्टींना न घेताच विमान दिल्लीला
By admin | Published: June 15, 2017 01:42 AM2017-06-15T01:42:36+5:302017-06-15T01:42:36+5:30
विमान कंपन्या, विमानातील कर्मचारी आणि खासदार यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. जेट एअरवेजच्या हलगर्जीपणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विमान कंपन्या, विमानातील कर्मचारी आणि खासदार यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. जेट एअरवेजच्या हलगर्जीपणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांना बुधवारी मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीला निघालेल्या शेट्टी यांनी मुंबई विमानतळावर वेळेत पोहोचून रीतसर बोर्डिंग पास घेतला असतानाही त्यांना न घेताच विमानाने उड्डाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यातील वाद गाजला होता. दिल्लीला जाण्यासाठी खासदार शेट्टी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. ६ वाजता त्यांनी बिझनेस क्लासचे तिकीटही घेतले. तासभर आधीच विमानतळावर दाखल झालेल्या शेट्टी यांनी बोर्डिंग पास घेतला. विमानाच्या उड्डाणाला वेळ असल्याने ते काही वेळ लॉजमध्ये बसले होते. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी आले असता बोर्डिंग बंद झाल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. ‘बोर्डिंग पास घेतलेला असताना आणि रजिस्टरमध्ये नोंद केलेली असताना, मला न घेता विमानाने उड्डाण भरलेच कसे, असा सवाल शेट्टी यांनी केला. याबाबत जेट एअरवेजकडे विचारणा केली असता कंपनीनेही हात वर केले.
शेट्टी यांनी आपल्याला आवश्यक मिटिंगसाठी दिल्लीला जाणे गरजेचे असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्या वेळी जेट एअरवेज प्रशासनाने त्यांना ७च्या विमानाचे बदली तिकीट दिले. पण त्यासाठी दोन हजार रुपये वसूल केले. शेट्टी यांनी चूक नसल्याने पैसे भरण्यास नकार दिला. मात्र जेट एअरवेज ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी शेट्टी यांनी कार्डद्वारे दोन हजारांचे पेमेंट केले. मात्र त्याची पावती देण्यास नकार दिला. जेट एअरवेजमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल विमानतळ प्राधिकरणाकडे शेट्टी तक्रार करणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.
पैसे परत करण्याचे आश्वासन
जेट एअरवेजने झाल्या प्रकाराबद्दल शेट्टी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून, पर्यायी व्यवस्थेसाठी वसूल केलेले दोन हजार रुपये परत करण्याचे आश्वासन दिले आहे. टी-२ टर्मिनस शांतता क्षेत्र असल्याने अनाऊंसमेंट करण्यात आली नाही, असे सांगताना शेट्टी बोर्डिंगसाठी वेळेवर आले नसल्याचा दावाही जेटने केला. मात्र, नियमानुसार लोकप्रतिनिधींना मदतनीस पुरविणे आवश्यक असताना त्याबाबत जेटने मौन बाळगले आहे.