भाजपाने जिजाऊ-शिवरायांच्या स्वप्नाचा चुराडा केला, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 04:01 PM2018-01-12T16:01:39+5:302018-01-12T16:17:13+5:30
शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार.
सिंदखेड राजा (बुलडाणा) : शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. त्यांना फक्त मलाई खायला पाहिजे, अशा शब्दात आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली.
राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाच्या वतीने मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. जातीयवादाच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. सध्याच्या भाजप सरकराने हेच केले असून माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांची स्वप्ने शाळा बंद करून त्यांचा भंग केला आहे, असे केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले. तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल, जिम, हाँकी मैदाने निर्माण केली आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत दहा टक्के निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. ख-या अर्थाने आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार करोडचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते तर तीन लाख करोडचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालवणे का जमू नये. कारण त्यांना पैसा खायचा आहे. महाराष्ट्रात सध्या घोटाळे समोर येत आहेत. दिल्लीत जनतेने अर्थात रयतेने काँग्रेस, भाजपलाही सत्तेतून दूर हाकलून सामान्य मानसाचे अरथात आम आदमीची सत्ता प्रस्तापीत केली. त्यामुळेच मोफत आरोग्य सुविधा, देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीमध्ये उपलब्ध करून देऊ शकलो असेही केजरीवाल म्हणाले.
भाजप हा दंगेखोरांचा पक्ष-
भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. देशद्रोही, गद्दारांचा या पक्षात समावेश आहे. पाकिस्तान गत ७० वर्षांपासून भारतात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्या देशाला जे ७० वर्षांत जमले नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात करून दाखविले. या सरकारच्या काळात देशात अराजकता माजली असून, जातीय दंगली वाढल्या आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा संदर्भ देताना ‘जातीय दंगली घडवा आणि राज्य करा’ हेच धोरण या सरकारचे असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा घटनेचा जाहीर निषेधही केला.
या कार्यक्रमास दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शरमा मेनन, सिंचन घोटाळा काढणारे विजय पांढरे, राहूल चव्हाण, देवेंद्र वानखेडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, बुलडाणा जिल्हा प्रभारी संयोजक सुनील मोरे, लक्ष्मण कोल्हे, अनिल पटेल, अजिंक्य शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.