दिल्लीने दिला युतीचा कौल?
By Admin | Published: March 1, 2017 06:42 AM2017-03-01T06:42:06+5:302017-03-01T06:42:06+5:30
भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले.
नवी दिल्ली /मुंबई : महाराष्ट्रातील १0 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले. तब्बल दीड तास झालेल्या चर्चेमध्ये आता निवडणुका संपल्यामुळे शिवसेनेशी पुन्हा संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते.
गेली २५ वर्षे आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांची मदत घेतल्यास आपली कायमस्वरूपी अडचण होईल आणि ती होणे योग्य नाही, अशी दिल्लीतील भाजपा नेत्यांची भूमिका आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हेही दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र यायला हवे, या मताचे आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपा यांच्यातील संबंध सुधारण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू होण्याची चर्चा आहे. पुन्हा एकत्र येताना मुंबई महापालिकेत भाजपाला अगदीच दुय्यम भूमिका मिळता कामा नये आणि काही महत्त्वाच्या समित्यांची अध्यक्षपदे तसेच अडीच वर्षे महापौरपद आपल्याला मिळावे, अशी भाजपामधील अनेकांची मागणी आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या चर्चेत राज्यात भाजपची सुधारलेली कामगिरी आणि मुंबईचे महापौरपद हे प्रमुख मुद्दे होते. मात्र शिवसेनेच्या धमक्या आणि त्यातून आलेली कटुता यांवर अधिक विचारविनिमय झाल्याचे समजते. याच वर्षी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका यांमुळे आपण या घडीला कोणत्याही मित्रपक्षाशी संबंध तोडू नयेत, किंबहुना असलेली कटुता दूर करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेची आक्रस्ताळी भाषा, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे इशारे आणि राज्यातील सेनेच्या काही मंत्र्यांचा मनमानीपणा याची माहिती फडणवीस यांनी बैठकीत मोदी यांना दिल्याचे बोलले जाते. मात्र हे खरे असले तरी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणि महाराष्ट्रात युतीमध्ये असलेल्या भाजपशी संबंध बिघडवण्याची ही वेळ नाही, असे मोदी म्हणाले, असे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
निवडणुकांच्या आधी आणि त्या काळात शिवसेना व भाजपा यांच्यात निर्माण झालेली कटुता संपवून, पुन्हा संबंध सुधारणे गरजेचे आहे. मात्र तसे करताना आपण झुकता कामा नये, असे मोदी यांनी फडणवीस यांना सुचवल्याचे कळते. या बैठकीबाबत फडणवीस यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यांची पंतप्रधानांशी झालेली चर्चा प्रामुख्याने शिवसेनेशी यापुढे कसे संबंध असावेत, यावर झाल्याचे कळते.
>दोघे घेणार पुढाकार? :
भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यासाठी पुढाकार घेतील, असा अंदाज आहे. या दोघांनी याआधीही अनेकदा दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका जाहीरपणे घेतली आहे. मात्र शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे गरजेचे आहे.