हल्लेखोर रुग्णाची मनोरुग्णालयात रवानगी
By Admin | Published: April 5, 2017 05:35 AM2017-04-05T05:35:55+5:302017-04-05T05:35:55+5:30
नौपाड्यातील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर कात्रीने हल्ला करणाऱ्या दुसऱ्या रुग्णाची न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली
ठाणे : नौपाड्यातील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर कात्रीने हल्ला करणाऱ्या दुसऱ्या रुग्णाची न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे.
किस्मतअली साहेबअली शेख (वय ३0) याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे १ एप्रिल रोजी नौपाड्यातील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. ताप जास्त असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान संतुलन गेल्याने त्याला बांधले जात असतानाच त्याने कैचीने हल्ला चढवला. या हल्ल्यात रुग्णालयात काम करणारे संदीप मोरे आणि त्यांचे सहकारी विनोद कदम यांच्यासह आबीद बेग मिर्झा नावाचा रुग्णही जखमी झाला होता. आबीद बेग मिर्झा यांच्या छातीवर कात्रीचे घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आतापर्यंत ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता त्यांना पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
किस्मतअली या हल्लेखोर रुग्णाची रवानगी ठाण्यातील मनोरुग्णालयात करण्यात आली आहे. त्याच्या मानसिक स्थितीची माहिती न्यायालयास दिल्यानंतर, न्यायालयानेच तसे आदेश दिल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली. (प्रतिनिधी)