रेल्वे स्थानकावर महिलेची प्रसूती!
By admin | Published: July 9, 2016 12:27 AM2016-07-09T00:27:06+5:302016-07-09T00:27:06+5:30
शेगावच्या रेल्वे स्थानकावरील घटना; रेल्वे पोलिसांकडून सहकार्य.
शेगाव (जि. बुलडाणा): शेगावच्या रेल्वे स्थानकावर प्रवासी महिलेची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी घडली. रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस व महिलांनी प्रसंगावधान राखून तिची प्रसूती केली.
उंद्री तालुका चिखली येथील अर्चना विजय पैठणी (वय २८) ही महिला रायपूरवरून शेगावकडे रेल्वेने प्रवास करीत होती. अकोल्यात एक्स्प्रेस गाडीने उरतल्यानंतर शेगाव येथे पोहोचण्यासाठी त्यांनी वर्धा-भुसावळ ही पॅसेंजर गाडी पकडली. यावेळी गर्भवती असलेल्या अर्चनाला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाडी शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचत असताना महिलेला प्रसूतीकळा वाढत असताना पॅसेंजर गाडी ही रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी तिच्यासोबतचा पती विजय पैठणी व दीर होता.
बोगीतून खाली उतरताच महिला प्लॅटफॉर्मवरच खाली बसली. पाह ता पाहता गर्दी वाढल्याने कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी संजय मिर्जापुरे, बाळू खिराळे व ज्योती खिराळे यांनी सदर महिलेला प्रसूती होत असल्याचे पाहता प्लॅटफॉर्मवरच आडोसा केला. यावेळी प्लॅटफॉर्मवरील इतर महिलांची मदत घेतल्यानंतर महिलेची सुखरुप प्रसूती झाली व तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.
यानंतर पोलिसांच्या मदतीने सदर महिलेस शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे महिलेवर प्रथमोपचार करण्यात आले. महिला व बाळ सध्या सुखरूप आहेत.