तीन रुपयांच्या वादातून थेट ग्रामविकासमंत्र्यांना फोन!
By admin | Published: November 18, 2016 05:14 AM2016-11-18T05:14:39+5:302016-11-18T05:14:39+5:30
एका प्रवाशी महिलेकडे येथील स्वच्छतागृहचालकाने गुरुवारी दुपारी तीन रुपये मागत अरेरावी केली.
बीड : बसस्थानकात महिलांना स्वच्छतागृहाची विनामूल्य सोय उपलब्घ करून देण्यात आली आहे. मात्र, एका प्रवाशी महिलेकडे येथील स्वच्छतागृहचालकाने गुरुवारी दुपारी तीन रुपये मागत अरेरावी केली. त्याला धडा शिकवण्यासाठी या महिलेने मोबाइलवरून थेट ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला. पंकजा यांनीही तातडीने भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महिलेच्या मदतीस पाठविले आणि मुजोर स्वच्छतागृहचालकाला धडा शिकविला. सुनीता शंकर मुळे (रा. वडीकाळे, ता. अंबड, जि. जालना) असे या प्रवाशी महिलेचे नाव आहे. त्या परळी येथील माहेरहून सासरी जात होत्या. बीड बसस्थानकात स्वच्छतागृहचालक राकेश शर्मा याने त्यांच्याकडे ३ रुपये मागितले.
वस्तुत: ही सुविधा विनामूल्य असल्याचे स्वच्छतागृहाच्या दर्शनी भागावर ठळक अक्षरात लिहिलेले आहे. मात्र, शर्मा ऐकायला तयार नव्हता. सुनीता यांनी १०० ची नोट काढून त्याच्या हातावर टेकवली. तरीही तो सुट्या पैशांसाठी हुज्जत घालू लागला. अखेर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून, सुनीता यांनी पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला व सर्व परिस्थितीची माहिती दिली.
या वेळी मुंबईत असलेल्या पंकजा यांनी तातडीने भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अॅड. संगीता धसे यांना तेथे पाठविले. धसे यांनी कानउघाडणी केल्यावर शर्माने सुनीता मुळे यांची माफी मागितली आणि या पुढे महिलांची अडवणूक करणार नाही, असे मान्य केले. (प्रतिनिधी)