मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी द्यावी सेना नगरसेविकेची मागणी
By admin | Published: July 14, 2017 05:39 AM2017-07-14T05:39:16+5:302017-07-14T05:39:16+5:30
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रभाग क्रमांक ७च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतच्या ठरावाची सूचना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडावी, अशी मागणी केली आहे. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, या काळात महिलांना वेदना सहन कराव्या लागतात. महिला होणारी वेदना कोणालाही सांगू शकत नाहीत. त्यासाठी एक दिवसाच्या सुट्टीची मागणी करत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. महिला कामाच्या ठिकाणी ८ ते ९ तास काम करतात. मात्र पाळीच्या दिवसांत काम करणे कठीण जाते. यासाठी ही सुट्टी गरजेची आहे; मात्र याचा गैरवापर होऊ नये म्हणून याबाबत नियमावली बनवली जावी अशी भूमिकाही म्हात्रे यांनी आपल्या पत्रात मांडली आहे.