सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:27 AM2020-04-10T06:27:42+5:302020-04-10T06:28:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना पत्र : आव्हाड यांना आरोपी करण्यासाठी भाजप आक्रमक
ठाणे : सोशल मिडियावर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीका करण्यात येत आहे. त्यांची हत्या करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा उद्रेक होत आहे. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, मारहाणप्रकरणी आव्हाड यांचाही आरोपींमध्ये समावेश करण्याबरोबरच संबंधित पोलीस सुरक्षा रक्षकांना तातडीने निलंबित करण्याची मागणी भाजपच्या ठाण्यातील आमदारांनी केली आहे.
आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमुसेने गलिच्छ शब्दांमध्ये गेली चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कार्यकर्ते यांच्याविरु द्ध लिखाण केले आहे. आव्हाड यांच्याविरु द्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेजही टाकले आहेत. एकीकडे वैचारिक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करुन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो. खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. यांच्याविरु द्ध कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला तर निष्कारण दोष दिला जातो. याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. या निवेदनासोबत आव्हाड यांना दिलेल्या धमक्या, कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टीप्पण्यांचे पुरावे सादर केले.
दरम्यान, ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेला मारहाणीचा प्रकार हा न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच ही मारहाण झाली. तिथे झालेल्या मारहाणीच्या वेळी आव्हाड हे उपस्थित असल्याचा फिर्यादीमध्ये उल्लेख आहे. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना केवळ एक अनोळखी आरोपी अशी फिर्याद नोंदवली. या प्रकरणात आव्हाड यांच्या नावाचीही नोंद करावी. याप्रकरणी सुरक्षा दलातील पोलिसांचे निलंबन करुन चौकशी करावी. करमुसे आणि आव्हाड यांच्या घराबाहेरील आवाराचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून योग्य ती कार्यवाही करावी, असेही या निवेदनात भाजपच्या आमदारांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी मागण्या आणि तक्रारींमुळे हा वाद चांगलाच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.