पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी
By Admin | Published: June 9, 2016 01:49 AM2016-06-09T01:49:48+5:302016-06-09T01:49:48+5:30
पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
चासकमान : महिला बालकल्याण, समाजकल्याण व कृषी विभागामार्फत १० व २० टक्के निधीमधून वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून पीठ गिरणी, पिको-फॉल मशिन, सौरकंदील, मसाला कांडप, केशकर्तनालय खुर्ची, कडबाकुट्टी, कृषिपंप व शेतीसाठी अवजारे देण्यात येत आहेत. अर्जावरील शिफारस प्रमाणपत्राद्वारे पंचायत सदस्यांकडून मजीर्तील लाभार्थींना लाभ दिला जात आहे. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत, तसेच पंचायत समिती सदस्यांची शिफारसपत्र घेण्याचा कोणताही शासन निर्णय नसताना त्यांनी शिफारसपत्र देऊन पदाचा गैरवापर केला आहे. गोरगरीब खरे लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून या लाभाच्या योजनेमधून पंचायत समिती सदस्यांची शिफारस तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पवळे यांनी केली आहे.
जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षात असताना या शिफारशींना तीव्र आक्षेप घेतला होता. ही शिफारस रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर ही शिफारस रद्द करण्याचा आदेश तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी दिला होता. त्यानुसार मध्यंतरी काही काळ ही शिफारस रद्द करण्यात आली होती.