मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी
By admin | Published: April 2, 2015 04:55 AM2015-04-02T04:55:14+5:302015-04-02T04:55:14+5:30
मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
मुंबई : मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुंबईतील चांगले आर्किटेक्ट बोलावून नवा आराखडा तयार करा, असे ते म्हणाले. तर भाजपाचे आशीष शेलार आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी प्रस्तावित आराखडा मराठीत प्रसिद्ध करून त्यानंतर दोन महिन्याच्या आत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवा, अशी जोरदार मागणी केली. बाहेर टीकेचा विषय झालेला हा आराखडा विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या रोषाचा विषय ठरला.
मुंबईच्या विकासासंदर्भात नियम २९३ नुसार सभागृहात चर्चा झाली. त्यावेळी भुजबळ यांनी एकामागून एक एफएसआय वाढवून देण्याने श्रीमंताचे भले होईल पण मुंबई मृत्यूपंथाला लागेल, असा इशारा दिला. शेलार म्हणाले की, हा आराखडा तयार करण्याचे काम एससीई या फ्रेंच कंपनीला देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष हे काम ईजीस जिओ प्लॅन या कंपनीने केले. विकास आराखड्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे. या आराखड्यात मुंबईचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण असावे अशी कार्यकक्षा महापालिकेच्या स्थायी समितीने ठरवून दिली होती. पण तसे कुठेही दिसत नाही असे ते म्हणाले.
यावेळी जयंत पाटील, मंगलप्रभात लोढा, सदा सरवणकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, वारिस पठाण, भारती लव्हेकर, सुनील शिंदे, धैर्यशील पाटील, रमेश लटके, अमित साटम, पराग अळवणी, अबू आझमी यांनी या चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)