शेततळ्याचे निकष बदलण्याची मागणी
By admin | Published: July 29, 2016 03:32 AM2016-07-29T03:32:55+5:302016-07-29T03:32:55+5:30
राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून
मुंबई : राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून एक लाखापर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तथापि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी सुस्पष्ट शब्दात उत्तर टाळल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही त्यांना फटकारले आणि जर ५० हजारात शेततळे होत नसताना अनुदानाची रक्कम सरकार का वाढवित नाही, अशी विचारणा केली.
प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय प्रतापराव पाटील चिखलीकर यानी उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यात १ कोटी ३७ लाख शेतकरी असून त्यापैकी केवळ एक लाख ५० हजार शेतकरी अर्ज करतात म्हणजे योजना पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. शेततळ्यास ८० हजार रुपये खर्च येतो, प्लॅस्टीक कागदाची किंमत वेगळी असते. त्यामुळे ही अनुदानाची रक्कम एक लाख करावी अशी मागणी त्यांनी केली. योजनेसाठी प्राप्त प्रस्तावावर लवकर निर्णय होत नसल्याने बरेच दिवस प्रलंबित रहात असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. मंत्री रावळ यांनी ५१ हजाराचे उद्दीष्ट असताना दीड लाख अर्ज प्राप्त झाले, त्यामुळे योजनेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचा दावा केला. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी ही योजना मागेल त्याला शेततळे असे नाव असेल तर लक्षांश कसा ठरविला, अशी विचारणा केली. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त डोंगरी भागाचा योजनेत समावेश करावा अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मौन
वारंवार मागणी करुनही मंत्री रावळ त्याला बगल देतअसल्याचे निदर्शनास येताच त्यांना अध्यक्ष बागडे यांनी अनुदानाची रक्कम वाढविणार की नाही हे सांगा अशा शब्दात त्यांना खडसावले. त्यानंतर रावळ यांनी पुढील वर्षापासून अनुदानाची रक्कम वाढवून देण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगून चर्चेवर पडदा टाकला.