'या' कारणामुळे मातीच्या विटांची मागणी घटली; व्यावसायिक झाले त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:44 PM2020-01-15T23:44:54+5:302020-01-15T23:45:09+5:30
बांधकामासाठी सिमेंटच्या विटांचा मोठ्या प्रमाणावर वापर
पोलादपूर : आधुनिक काळात सिमेंटचा वापर अधिकाधिक वाढत असल्याने पारंपरिक मातीच्या विटा मागे पडू लागल्या आहेत. दिवसेंदिवस विटांची घटती मागणी पाहता, वीट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा वीट व्यवसाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून व्यावसायिक हतबल झाले आहेत.
बांधकाम व्यावसायिक इमारत उभारताना सिमेंटच्या बॉक्स ना प्राधान्य देत आहेत. हाताळायला हलके असल्याने तसेच बांधकाम करण्यास सुलभ असल्याने मातीच्या विटांच्या जागी बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने स्थानिक वीट व्यावसायिक मंदीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येत आहे. आज सिमेंटच्या वस्तू वापरण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. त्यामुळे पूर्वीपासून वापरात असलेल्या या पर्यायी वस्तू आणि त्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांचा कल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कुंभार समाजातील अनेकांचा या विटा तयार करून रोजीरोटी चालविण्याचा व्यवसाय आहे. अनेक कुंभार बांधवांची गुजराण या वीट व्यवसायावरच आहे. त्यासाठी आपल्या मीठ-भाकरीच्या संसारासह इतर गावांमध्येही त्यांची अनेक कुटुंबे जातात. त्यामुळे चार महिने अतिशय काबाडकष्टाच्या या व्यवसायास आता सुरुवात झाली आहे. एका विटेला साधारणत: सात ते आठ वेळा हात मारावा लागतो. माती उत्कृष्टरीत्या मळावी लागते आणि विटेच्या लोखंडी किंवा लाकडी साच्यामध्ये घालून या विटा काढाव्या लागतात. मग त्या पक्क्या स्वरूपात आणण्यासाठी भट्टीमध्ये भाजाव्या लागतात. एवढ्या सगळ्या प्रक्रियेत उन्हातान्हात कष्टाचे काम करूनही शेवटी सात हजार ते आठ हजार रुपयांना एक हजार विटा, असा दर मिळतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबास चार महिने केलेल्या मेहनतीवर शेवटी पाणी पडते, त्यामुळे व्यवसाय सध्या धोक्यात आहे.
1. आज सिमेंटच्या विटांना वाढती मागणी आहे. त्यामुळे या मातीच्या भाजलेल्या विटांची मागणीही आता कमी होत आहे. त्यामुळे कित्येक वीट व्यावसायिकांनी स्वत: उत्कृष्ट कारागीर व या व्यवसायात पारंगत असूनही या व्यावसायातील मालकीपणा बाजूला ठेवून स्वत: इतरांकडे मजुरीस जातात. फायद्यापेक्षा अधिक प्रमाणात तोटा व धोकाच या व्यवसायात पत्करावा लागतो.
2. अनेकदा वीट व्यावसायिकांकडे आदिवासींसह कर्नाटकमधील कामगार रोजंदारीवर काम करत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कामगारांची कमतरता तसेच वीटला उठाव नसल्याने मातीचे वाढते दर, भट्टीसाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने वीट उत्पादक हतबल झाले आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायिकच इमारत उभारताना सिमेंटच्या बॉक्सला प्राधान्य देत असल्याने वीट उत्पादकांवर उपासमारीची वेळ आली आहे.