साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:25 PM2020-01-16T16:25:51+5:302020-01-16T17:12:41+5:30
साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साई बाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात.
औरंगाबाद : साईबाबा यांच्या जन्मस्थानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा हे साईबाबांची प्रगट भूमी असल्याचा इतिहास असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जन्मभूमीप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी साई भक्तांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी आहे. तर राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांकडून जन्मभूमीबाबत वाद उकरून काढला जात असल्याचे म्हणत पाथरीतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. साईबाबा यांची प्रगट भूमी म्हणून ओळखले जाणारे धुपखेडा गाव औरंगाबादेतील पैठण तालुक्यात आहे. मात्र हे गाव शिर्डीप्रमाणे मोठ होऊ शकले नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे, त्याचप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी परिसरातील साई भक्तांकडून होत आहे.
धुपखेड्याच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे?
साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साईबाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात. तर याच गावात त्यांचे मंदिर असून, बाबा जेव्हा भिक्षा मागून यायचे तेव्हा ते याच ठिकाणी झोपत असल्याचे सुद्धा गावकरी सांगतात. त्यांनतर बराच काळ बाबा याठिकाणी वास्तव्यास असल्याचे गावकरी सांगतात. तर शिर्डीप्रमाणे ईतेही मंदिरा शेजारी 2 कडू लिंबाचे झाड असून योगायोग म्हणजे शिर्डीप्रमाणेचं या झाडांची पाने सुद्धा गोड असल्याचेही गावकरी सांगतात.
काही वर्षांच्या वास्तव्यानंतर साईबाबा हे गावातील चांद पटेल यांच्या नातेवाईकाच्या लग्नात शिर्डीत गेले. त्यानंतर शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी मालासापती यांनी बाबांना शिर्डीतंच थांबवून घेतले. कालांतराने साईंच्या चमत्काराने शिर्डीला मोठ केलं. तर साईबाबा या गावात राहिले म्हणून धुपखेड्यात त्यांचे मंदिर असून मोठ्याप्रमाणावर भक्त या गावाला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीप्रमाणे प्रगटभूमीचा विकास करण्याची मागणी येथील साईमंदिराचे अध्यक्ष पांडूरंग वाघचौरे यांनी केली आहे.