एकाच दिवशी होणाऱ्या विविध विभागातील परीक्षांचे वेळापत्रक बदला: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 04:28 PM2019-11-18T16:28:18+5:302019-11-18T16:29:12+5:30
उमेदवारांना दोन्हीही परीक्षांना बसता येईल यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे अशी विनंती मुंडे यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केली आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता या पदासाठी अनुक्रमे येत्या २५ व २५-२६ तारखेला होणाऱ्या पदभरती या दोन्ही परीक्षा उमेदवारांना देता याव्यात यासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
येत्या आठवड्यात २४ तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापत्य अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता या २४३ पदांसाठी २५ रोजी तर २५ व २६ रोजी जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता या ५०४ पदासाठी परीक्षा होत आहेत. एकाच दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा होत असल्यामुळे उमेदवारांना कुठल्याही एकाच परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे विध्यार्थांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती व जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती२०१९ या दोन्ही परिक्षा एकाच दिवशी आयोजित केल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळावी म्हणून माननीय राज्यपालांनी हस्तक्षेप करावा यासाठी त्यांना पत्र दिले. pic.twitter.com/gyqrNsWdum
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 18, 2019
ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील होतकरू अत्यंत बिकट परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यात राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढलेली असल्यामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी प्रत्येकाला आजमवायला मिळायला हव्यात असे मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा जलसंपदा यापैकी एका विभागाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून उमेदवारांना दोन्हीही परीक्षांना बसता येईल यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे अशी विनंती मुंडे यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केली आहे.