हुंडा मागणे भोवले; तीन जणांना अटक
By admin | Published: May 9, 2016 01:53 AM2016-05-09T01:53:20+5:302016-05-09T01:53:20+5:30
मूर्तिजापूर पोलिसांची कारवाई; तीन आरोपींना पोलीस कोठडी.
अकोला: तब्बल १0 लाख रुपये घेऊनही पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी मानोर्या तालुक्यातील तिघांना शनिवारी अटक केली तर गुन्हा दाखल झालेले अन्य तीन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम वसराम पवार (५५ रा. गौरखेडी) यांच्या मुलीचा विवाह देवानंद हेमंत चव्हाण (३0 रा. पाळोदी ता. मानोरा जि. वाशिम) याच्याशी हुंड्याविना निश्चित करण्यात आला होता. २८ मार्च रोजी साक्षगंध झाले. वधुपित्याने वर देवानंदला पाच ग्रॅमची अंगठी व पाच हजारांचे कपडे दिले होते. साक्षगंध आटोपल्यानंतरही लग्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.
नवदेव पोहोचलाच नाही.
३0 एप्रिलला आयोजित लग्नसोहळ्याला नवरदेव आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या वधुपक्षाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. वधुपिता उत्तम वसाराम पवार यांनी संबंधितांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२0 (फसवणूक) व हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूर्तिजापूरचे ठाणेदार आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बोरोकार, गणेश ढोके करीत आहेत.
आरोपी पोलीस कोठडीत
गुन्हा दाखल झाल्यानंतर ७ मे रोजी आरोपी भारत चंदुसिंह चव्हाण (४६), गणेश चंदुसिंह चव्हाण (५२) रा. पाळोदी यांना अटक करण्यात आली, तर नवरदेव देवानंद हेमंत चव्हाण (३0) याला ८ मे रोजी नरखेड येथून जेरबंद करण्यात आले. या तिघांना १३ मेपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी रवि हेमंत चव्हाण, रीता रवि चव्हाण, देवकाबाई हेमंत चव्हाण यांचा पोलीस शोध घेत आहेत.