पुण्यासाठी लवासाचे पाणी घेण्याची मागणी
By Admin | Published: January 14, 2016 02:17 AM2016-01-14T02:17:50+5:302016-01-14T02:17:50+5:30
पुणेकरांची पाणीकपात न वाढविता लवासाशी झालेल्या करारानुसार, त्यांच्या धरणांमधील पाणी वरसगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने जिल्हाधिकारी
पुणे : पुणेकरांची पाणीकपात न वाढविता लवासाशी झालेल्या करारानुसार, त्यांच्या धरणांमधील पाणी वरसगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
लवासा कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळात झालेल्या करारानुसार, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लवासाने बांधलेल्या गडले आणि दासवे धरणांतील पाणी आवश्यकता असेल तेव्हा कोणत्याही अटींशिवाय वरसगाव धरणात सोडणे बंधनकारक आहे. या करारानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तसेच बारामती तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरण साखळीतून एक टीएमसी तसेच मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे शहरातील पाणी कपात वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लवासाचे पाणी घ्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.