पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By admin | Published: December 23, 2015 01:22 AM2015-12-23T01:22:16+5:302015-12-23T01:22:16+5:30
राज्य शासनातील पाच मंत्र्यांच्या विभागांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, यासंदर्भात न्यायालयीन चौकशी लावण्यात यावी
नागपूर : राज्य शासनातील पाच मंत्र्यांच्या विभागांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, यासंदर्भात न्यायालयीन चौकशी लावण्यात यावी. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या मंत्र्यांनी पदत्याग करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नियम २६० अन्वये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढविला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या मंत्र्यांच्या कारभारावर मुंडे यांनी टीका केली.
डाळींच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध का उठवले गेले? साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला दिले होते. पण कोणत्याही साठेबाजावर कारवाई करण्यात आली नाही. राज्यात डाळींच्या साठेबाजीमुळे चार ते साडेचार हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागात तर महापुरुषांच्या छायाचित्रांचादेखील आर्थिक घोटाळा झाला आहे. राज्याच्या उद्योग विभागाने यासंदर्भात शासकीय कार्यालयांना सावध करूनही शिक्षण विभागाने ही छायाचित्रे व पुस्तक खरेदी जाणूनबुजून केली आहे. ७ व १२ रुपयांची छायाचित्रे १ हजार ३९५ रुपयांना घेण्यात आली, असा आरोप मुंडे यांनी केला. राज्यात शेतकरी संकटात सापडला असताना ऊर्जाखात्याने सौरऊर्जा पंपांची योजना आणली. परंतु यातदेखील महागड्या दराने खरेदी झाली. यात भ्रष्टाचार झाला असून यासंदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मुंडे यांनी मागणी केली. राज्य शेती महामंडळाची जमीन संयुक्त शेती अंतर्गत करारपद्धतीने देण्याच्या टेंडर प्रक्रियेतदेखील भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली.आमचा ‘सीबीआय’च्या चौकशीवर विश्वास नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणांची ‘कमिश्नर आॅफ इन्क्वायरीज् अॅक्ट’ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उचलून धरली.