अपघात की घातपात?; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांच्या कार अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:46 AM2023-01-07T09:46:37+5:302023-01-07T09:47:38+5:30
अपघात झाला तो सामान्य अपघातासारखा वाटत नाही. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे असं योगेश कदम यांनी म्हटलं.
मुंबई - शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटात अपघात झाला. या अपघात प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. योगेश कदम यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा? असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
आमदार योगेश कदम म्हणाले की, रात्री ९ च्या सुमारास खेडवरून निघालो. कशेडी घाट उतरल्यानंतर माझ्यापुढे रायगड पोलिसांची गाडी होती. त्यानंतर माझी गाडी आणि माझ्या मागे रत्नागिरी पोलिसांची गाडी होती. डंपर जो आला तो प्रचंड वेगाने आला. रस्ता मोठा होता. माझ्या कारला त्या डंपरने धडक दिली त्यात माझी कार ३६० डिग्री फिरली. त्यानंतर तो डंपर पुढे पळून गेला. त्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर डंपर रस्त्याखाली दिसला आणि डंपरचालक फरार झाला होता. सुदैवाने आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही वाचलो. माझ्या वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत या अपघातानंतर अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. मी सीटबेल्ट लावला होता म्हणून मला काहीच झालं नाही. पोलादपूरच्या त्याच दुर्घटनास्थळी महिनाभरापूर्वी अपघात झाला होता त्यात संपूर्ण कुटुंब मयत झाले होते. मुंबई-गोवा हायवेवरील अपघात होतात. हा प्रश्न वारंवार मांडला जातोय. कदाचित योगेश कदम आज नसता तर यावर तातडीने काही पाऊले उचलली असती. रस्ते अपघात कधी थांबणार हा प्रश्न आम्हाला पडलाय असं आमदार योगेश कदम म्हणाले.
तसेच अपघात झाला तो सामान्य अपघातासारखा वाटत नाही. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे. संबंधित पोलीस अधिकारी तपास करतील. ज्या शंका मला वाटतात त्या पोलिसांना सांगितल्या आहेत. माझ्या मागे आणि पुढे पोलिसांची गाडी असताना डंपर माझ्या कारला धडकला. १०० च्या वर त्या डंपरचं स्पीड होते. माझ्या कारचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा घातपात आहे की नाही याची खात्री करणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे.