Oil Refinery: रत्नागिरीत नव्हे, तर विदर्भात रिफायनरी उभारण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 08:55 AM2022-04-04T08:55:29+5:302022-04-04T08:55:59+5:30
Oil Refinery News: रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपूर : रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प रत्नागिरीऐवजी विदर्भात उभारावा, असे स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांचे मत आहे.
या प्रकल्पाचे अनेक फायदे असून, या भागातील ५०० पेक्षा जास्त लघू व मध्यम उद्योगांची भरभराट अणि नवसंजीवनी मिळणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे. शिवाय नवे उद्योग उभे राहतील. या संदर्भात रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या नेतृत्वात झालेल्या पत्रपरिषदेत विदर्भात बहुतांश औद्योगिक आणि व्यावसायिक संघटनांनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यावर भर दिला.
‘वेद’चे अध्यक्ष शिवकुमार राव आणि उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले, प्रकल्प विदर्भात आल्यास त्यापासून तयार उत्पादनाच्या वाहतुकीला कमी खर्च येईल. यासह या प्रकल्पाशी जुळलेले प्रकल्प विदर्भात येतील. या प्रकल्पामुळे विदर्भात चार लाखांपेक्षा जास्तची गुंतवणूक येईल आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल.
माहेश्वरी म्हणाले, देशात रिफायनरी समुद्री भागासह जमिनी भागातही आहेत. समृद्धी महामार्गाला समांतर कच्च्या तेलाची पाईपलाईन टाकता येईल. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्ये इंधन स्वस्त मिळेल.
पत्रपरिषदेत रिफायनरी क्षेत्रातील तज्ज्ञ विनायक मराठे, बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुधे, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, व्हीपीआयएचे अध्यक्ष राकेश सुराना, आदी उपस्थित होते.