भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:54 AM2024-04-25T05:54:53+5:302024-04-25T05:55:51+5:30
३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती.
मुंबई : ऐन उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शितपेयांचा खप वाढल्याने साखरेची मागणी विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, यंदा साखरेची मागणी विक्रमी २.९ कोटी टनांवर जाऊ शकते. ३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती. मुंबई स्थित एका व्यावसायिकाने याविषयावर सांगितले की, यंदा अप्रैल-जूनदरम्यान साखरेची मागणी ५ टक्के वाढून ७५ लाख टनांवर जाऊ शकते.
रॅलींमुळे वाढली मागणी
बलरामपूर साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालिका अवंतिका सरावगी म्हणाल्या की, तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.
राजकीय रॅली आणि प्रचार सभांना गर्दी होत असल्यामुळे आईसक्रीम व शीतपेयांची विक्री वाढली आहे. त्यामुळे साखरेची मागणी वाढली आहे.
किमतीत ३% वाढ
बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलसाठी साखरेचा जास्तीचा कोटा वितरित केला आहे. तरीही सध्या घाऊक ग्राहकांकडून मजबूत मागणी असल्यामुळे साखरेच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.