हक्कभंगावरून रण पेटले! विधिमंडळ की चोरमंडळ म्हटल्याने संजय राऊतांवर हक्कभंगाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:15 AM2023-03-02T06:15:31+5:302023-03-02T06:16:35+5:30
विधिमंडळात गदारोळ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी कोल्हापुरात ‘विधिमंडळ नव्हे चोरमंडळ’ असे स्फोटक विधान केल्याचे तीव्र पडसाद उमटून विधानसभा व विधान परिषदेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ; जोरदार घोषणाबाजी झाली. कामकाज वारंवार तहकूब झाले व नंतर ते दिवसभरासाठी गुंडाळले गेले. राऊत यांचे विधान महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत सत्तापक्षाने विधिमंडळ डोक्यावर घेतले आणि तत्काळ कारवाईची जोरदार मागणी केली. दुसरीकडे विरोधकांसंदर्भात देशद्रोही हा शब्द वापरल्याबद्दल महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत तर राम शिंदे यांनी विधान परिषदेत राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आणि ठाकरे गट तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीलादेखील घेरले. सत्तारुढ सदस्य वेलमध्ये उतरून राऊत यांच्या अटकेची मागणी करू लागले. राऊत वा त्यांच्या विधानाचा बचाव कसा करायचा, हा प्रश्न पडल्याने बॅकफूटवर जाण्याची वेळ आलेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसंदर्भात बोलताना देशद्रोही असा उल्लेख केल्याचा मुद्दा विरोधकांच्या मदतीला धावून आला.
दिवसभरासाठी कामकाज तहकूब
n सत्तापक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज चार वेळा व नंतर दिवसभरासाठी तर विधान परिषदेचे कामकाज दोनवेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.
n राऊत यांच्या विधानावरून आता विरोधकांनी विधान परिषदेत शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली असून विधानसभेतही गुरुवारी हक्कभंग आणण्याची तयारी चालविली आहे.
संविधान नव्हे, जनतेचाही अपमान
n विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले, की विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असे विधान करणे हे सभागृहांतील सदस्यांचा अपमान करणारे, सदस्यांचाच नव्हे तर संविधानाचा व जनतेचाही अपमान करणारे आहे.
n हे अत्यंत गंभीर असून सभागृहाची ऊज्ज्वल परंपरा पायदळी तुडविली गेली आहे. या विधानाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ती येत्या दोन दिवसात करून आपण ८ मार्चला सभागृहात आपला निर्णय देवू.
नंतर केली सारवासारव
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर राऊत यांनी मला विधिमंडळाबद्दल आदरच आहे.
ज्या ४० लोकांनी आमचा शिवसेना पक्ष चोरला, चिन्ह चोरले त्यांचे विधिमंडळ म्हणजे चोरमंडळ बनू नये, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले राऊत...विधिमंडळ पक्ष नव्हे, तर चोरमंडळ
n कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
n संसदेत खासदार गजानन कीर्तिकर यांना गटनेता करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, ही खरी शिवसेना नसून डुप्लिकेट आहे.
n विधिमंडळ पक्ष नव्हे, तर चोरमंडळ आहे. त्यामुळे त्यांनी पदावरून हटवले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही.
n कारण अशी अनेक पदे आम्हाला उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यामुळे गटनेतेपदासारखी अनेक पदे ओवाळून टाकतो.