पेट्रोल, डिझेल खपात घट, गॅसची मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:16 AM2020-04-08T05:16:15+5:302020-04-08T05:16:44+5:30
लॉकडाउनचा परिणाम : मार्च महिन्याची आकडेवारी जाहीर
नवी दिल्ली : मार्च महिन्यात देशातील पेट्रोल, डिझेलच्या खपामध्ये मोठी घट झाली असून, स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात देशामध्ये सुरु झालेल्या लॉकडाउनचा हा परिणाम आहे. विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाची विक्रीही कमी झाली आहे.
देशात मार्च महिन्यामध्ये झालेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामधून ही बाब स्पष्ट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी होत असल्यातरी देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मात्र त्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत नाही.
मार्च महिन्यात देशातील पेट्रोलची मागणी १५.५ टक्के तर डिझेलची २४ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. देशातील कारखाने बंद असून, रस्त्यांवरील वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या खपामध्ये कपात झाली आहे.
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आल्याने विमानासाठी लागणाºया इंधनाची विक्रीही ३१ टक्क्यांनी कमी झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
दर कपातीबाबत कंपन्यांची चालढकल
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहे असे असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेलच्या किमती मात्र त्या प्रमाणात कमी झालेल्या दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाने २० वर्षांतील नीचांक नोंदविल्यानंतरही देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरामध्ये फारशी कपात केलेली दिसली नाही. देशातील लॉकडाउनच्या परिस्थितीत या कंपन्या आपला नफा वाढविण्याचा प्रयत्न करीत असून, त्याविरोधात फारसा आवाज कुणी उठवू शकत नाही.
च्मागीलवर्षी मार्च महिन्यात देशात पेट्रोलचा खप २२ लाख टन होता, तो यावर्षी १५.५९ लाख टनांपर्यंत कमी झाला आहे. देशामध्ये सर्वात जास्त विक्री डिझेलची होत असते, मागीलवर्षी याच महिन्यात ६३.४ लाख टन डिझेलची विक्री झाली होती. यावेळी त्यामध्ये २४.२ टक्के कपात होऊन ती ४८ लाख टनांवर आली आहे.
च्देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून स्वयंपाकाच्या गॅसच्या घरगुती सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. मार्च महिन्यात ही मागणी ३.१ टक्के वाढून २२.५० लाख टनांवर पोहोचली आहे. आगामी काळात स्वयंपाकाचा गॅस मिळणे कमी होण्याची भीती वाटत असल्याने नागरिकांनी सिलिंडरचे बुकिंग करण्याचा सपाटा लावलेला दिसत आहे. देशातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री आणि पुरवठा सुरळीत असून, तो तसाच चालू राहील असे आश्वासन सरकारने दिले आहे.