दिवाळीसाठी किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत तब्बल दहापटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:05 AM2021-10-23T09:05:08+5:302021-10-23T09:05:32+5:30

फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी

Demand for groceries and dry fruits for Diwali has increased tenfold | दिवाळीसाठी किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत तब्बल दहापटीने वाढ

दिवाळीसाठी किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत तब्बल दहापटीने वाढ

Next

- अभिजित कोळपे

पुणे : कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याने यंदाची दिवाळी नियमांचे पालन करून धूमधडाक्यात साजरी होत आहे. त्यादृष्टीने मार्केटमध्ये रेलचेल दिसून येत असून किराणा आणि ड्रायफ्रूटच्या मालाला दहापटीने मागणी वाढणार आहे. दसऱ्यापासून ते देवदिवाळीपर्यंतच्या कालावधीत पुणे मार्केटमध्ये साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास पुण्यातील होलसेल बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खरेदीचा असाच धमाका राज्यभरात असेल, असेही त्यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ड्रायफ्रूटच्या विविध मालाचे मोठ्या प्रमाणात दर वाढले होते. माल येणार नाही, आयातीवर परिणाम होईल म्हणून बदाम ८०० रुपयांवरून १२०० ते १४०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. त्यामुळे ते पुन्हा ८०० रुपयांवर आले आहेत. अशाच प्रकारे खारीक, काजू, मनुके, बदाम यांचे दर वाढले होते; मात्र सर्व ड्रायफ्रूटचे दर ‘जैसे थे’ झाले असून, ते स्थिर आहेत.

भाजक्या पोह्याला सर्वाधिक मागणी
यंदा परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे किराणा मालाची मागणी दहापटीने वाढणार आहे. उदा. भाजका पोहा १०० पोती एका महिन्यात विकला जायचा, आता दसरा ते देवदिवाळी या २० दिवसांच्या कालावधीत दहापटीने वाढून एक हजार पोती विकला जाईल, असे होलसेल व्यापारी राजेश शहा, विनोद गोयल यांनी सांगितले.

फराळाच्या वस्तूंना कशी मागणी आहे? 
तेल, पोहा, भाजका पोहा, मक्का पोहा, भाजकी डाळ, मुरमुरा, भडंग, भगर, मुरमुऱ्याचा चिवडा, लाडू बनविण्यासाठी बुंदी, फरसाण त्याचबरोबर एकमेकांना गिफ्ट, भेटवस्तू देण्यासाठी जास्त करून ड्रायफ्रूट या काळात लागतात. त्यात काजू, मनुके, बदाम आदींना प्रामुख्याने मागणी असते, असे ड्रायफ्रूटचे होलसेल व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

दर वाढले किंवा कमी झाले? 
सध्या पुण्याच्या बाजारात किराणा मालात तेल, शेंगदाणा, बेसन, 
ड्रायफ्रूटसह इतर सर्व वस्तूंचे भाव स्थिर आहेत. दोन महिन्यांपूर्वी 
ड्रायफ्रूटचे वाढलेले दर पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. 

Web Title: Demand for groceries and dry fruits for Diwali has increased tenfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.