उद्योगमंत्र्यांवर घोटाळ्याचे शिंतोडे, धनंजय मुंडेंची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:39 AM2017-08-05T01:39:54+5:302017-08-05T01:40:01+5:30
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळातील गदारोळ चालू असतानाच, आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे.
मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळातील गदारोळ चालू असतानाच, आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. औद्यागिक विकासासाठीच्या जमीन संपादनात मोठा घोटाळा झाला असून, या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.
स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मुंडे यांनी एमआयडीसीतील जमीन घोटाळ्याचा विषय समोर आणला. मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २०१६ साली मॅग्नेटिक महाराष्ट्रचे करार करण्यात आले; पण उद्योगधंद्यांना हवी असलेली जमीन मिळत नव्हती. अशा वेळी एमआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी ६० टक्के जमीन वगळण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र, सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळत पुढील कामकाज पुकारले. यानंतर विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. यासंबंधी पुढील आठवड्याच्या कामकाजात पुराव्यानिशी सविस्तर माहिती देणार असल्याचेही मुंडे यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले.